Narendra Modi Maldives Visit: काही महिन्यांपूर्वी भारताविरोधात गरळ ओकणारे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनच्या सांगण्यावरुन त्यांनी भारताशी पंगा घेतला, मात्र मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटन क्षेत्राला फटका बसल्यानंतर, त्यांना आपली चूक समजली. त्यामुळेच गेल्या काही काळापासून ते भारतासोबतचे संबंध पूर्ववत करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. याची प्रचिती आता पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ब्रिटन दौऱ्यानंतर आज थेट मालदीवमध्ये पोहोचले. राजधानी माले येथे पोहोचताच, राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी त्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत केले. या दरम्यान, राष्ट्रपती मुइझ्झू यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळ देखील विमानतळावर उपस्थित होते. यामध्ये मालदीवचे परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि गृह सुरक्षा मंत्र्यांसह इतर मंत्र्यांचा समावेश होता.
राष्ट्रपती मुइझ्झू यांनी पंतप्रधान मोदींना मिठी मारून स्वागत केले. मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरुनच पंतप्रधान मोदी मालदीवला पोहोचले आहेत. मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या वर्षी भारत आणि मालदीवमधील राजनैतिक संबंधांना ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुइझ्झू भारतासोबतचे आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.