नरेंद्र मोदींनी नेपाळला दिला 'HIT' फॉर्म्यूला
By Admin | Updated: August 3, 2014 18:50 IST2014-08-03T17:42:19+5:302014-08-03T18:50:53+5:30
नेपाळ आणि भारतामधील संबंध दृढ करण्यावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळला 'HIT' फॉर्म्यूला दिला आहे. नेपाळला भारताकडून १० हजार कोटी नेपाळी रुपयांची मदतही नरेंद्र मोदींनी जाहीर केली आहे.

नरेंद्र मोदींनी नेपाळला दिला 'HIT' फॉर्म्यूला
ऑनलाइन टीम
काठमांडू, दि. ३ - नेपाळ आणि भारतामधील संबंध दृढ करण्यावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळला 'HIT' फॉर्म्यूला दिला आहे. यात H - हाय वे ( महामार्ग), I - इन्फो वे (इंटरनेट आणि डिजीटलायजेशन) आणि T - ट्रान्स वे (दळणवळण आणि वितरण) याचा समावेश असून या HIT मुळे नेपाळ विकासामध्ये हिमालयाऐवढ्या उंचीवर जाऊ शकतो असे मोदींनी म्हटले आहे. नेपाळला भारताकडून १० हजार कोटी नेपाळी रुपयांची मदतही नरेंद्र मोदींनी जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी नेपाळच्या संसदेला संबोधित केले. मोदींनी नेपाळी भाषेतून भाषणाला सुरुवात करुन नेपाळच्या लोकप्रतिनिधींची मने जिंकली. भारत आणि नेपाळमधील संबंध हिमालय आणि गंगेऐवढे जुने असून दोन्ही देश ह्रदयाने जोडली आहेत. नेपाळला दुःख झाल्यास आम्हालाही दुःख होते. या अतूट नात्याला नवीन उंचीवर नेण्याची गरज मोदींनी व्यक्त केली.
भारताला नेपाळमध्ये ढवळाढवळ करायची नसून नेपाळला विकासकार्यात साथ द्यायची आहे. नेपाळने नवीन उंची गाठावी हीच आमची इच्छा असल्याचे मोदींनी सांगितले. नेपाळने महामार्ग, इंटरनेटचे जाळे आणि दळणवळण - वितरणाचा विस्तार केल्यास हा देश हिमालयऐवढी प्रगती करु शकतो. विशाल पाणी संपत्ती लाभलेल्या या देशाने फक्त भारताला वीज विकल्यास त्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. आम्हाला नेपाळकडून वीज फुकट नको आणि वीजप्रकल्पामुळे तुमचे पाणीही वाया जाणार नाही असे मोदींनी आवर्जून सांगितले. सध्या आम्ही नेपाळला वीज देत असलो तरी दशकभरानंतर आम्हाला नेपाळकडून वीज घ्यायला मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मोदींचा जोर नेपाळमधील ५,४०० मेगावॅटचा खोळंबलेला प्रकल्प मार्गी लावण्यावर होता. या प्रकल्पाला नेपाळमधील केंद्रीय मंत्रिमंडळाने विरोध दर्शवला होता.
यूद्ध ते बुद्ध असा प्रवास करणा-या नेपाळने जगाला चांगला संदेश दिला. शस्त्रांऐवजी शास्त्रांद्वारे समस्यांवर मात करता येते हे नेपाळने जगासमोर दाखवले. याद्वारे हिंसेवर विश्वास ठेवणा-या देशांना एक नवा संदेश देता आला. आता लोकशाहीला पुरक असे सक्षम संविधान निर्माण केल्यास नेपाळचे नाव जागतिक स्तरावर सुवर्ण अक्षरात लिहीले जाईल असे मोदींनी सांगितले. महाकाली नदीवर पुल बांधल्यास भारत - नेपाळ आणखी जवळ येतील असे मोदींनी नमूद केले.