रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 08:04 IST2025-12-21T07:58:30+5:302025-12-21T08:04:57+5:30
अमेरिकन संसदेच्या हाऊस ओवरसाइट कमिटीच्या डेमोक्रेट सदस्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्रम्प यांचे फोटो गायब होण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे फोटो लपवले जात आहेत का असं विचारले आहे.

रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
वॉश्गिंटन - अमेरिकन न्याय विभागाच्या सार्वजनिक वेबसाईटवरून लैंगिक शोषणातील दोषी जेफ्री एपस्टीनशी निगडित कमीत कमी १६ महत्त्वाच्या फाईल्स रहस्यमयपणे गायबत झाल्या आहेत. या फाईल्स पोस्ट केल्यानंतर २४ तासांच्या आत त्या वेबसाईटवरून हटवण्यात आल्या आहेत. गायब दस्तावेजात एक असा फोटो होतो ज्यात तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, जेफ्री एपस्टीन आणि घिसलेन मॅक्सवेल एकत्र नजरेस आले होते.
सूत्रांनुसार, या फाईल शुक्रवारी वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या होत्या. परंतु शनिवारपर्यंत सर्वसामान्यांना त्या पाहता आल्या नाहीत. त्यात नग्न महिलांचे फोटो, फर्निचर आणि इतर फोटोंचा कोलाज होता. या फाईल्स जाणुनबुजून हटवण्यात आल्या की काही तांत्रिक बिघाडामुळे त्या वेबसाईटवर फोटो दिसत नाही यावर अमेरिकन न्याय विभागाने स्पष्टीकरण दिले नाही. फाईल्स अचानक गायब होण्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून जेफ्री एपस्टीन आणि त्याच्या संपर्कातील प्रभावी व्यक्तींबाबत जनतेत उत्सुकता वाढली आहे. अमेरिकन संसदेच्या हाऊस ओवरसाइट कमिटीच्या डेमोक्रेट सदस्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्रम्प यांचे फोटो गायब होण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे फोटो लपवले जात आहेत का असं विचारले आहे.
अलीकडेच एपस्टीन प्रकरणाशी निगडित हजारो पानांचे दस्तावेज एका कायद्यातंर्गत सार्वजनिक करण्यात आले आहेत. परंतु या दस्तावेजात ना दोषीबाबत ठोस माहिती आहे, ना कित्येक वर्ष या गंभीर गुन्ह्यातून आरोपी कसा वाचत होता यावर स्पष्टीकरण आहे. सर्वात जास्त प्रतिक्षा त्या पुराव्यांची होती, ज्यात पीडितांचा एफबीआयने जबाब नोंदवला होता. तेदेखील सार्वजनिक करण्यात आलेल्या दस्तावेजात नाही. यामुळे २००० च्या दशकात जेफ्री एपस्टीन याला दिलेल्या वादग्रस्त प्ली डील आणि संघीय संस्थांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, काही नवीन पैलूही समोर आले आहेत. १९९६ च्या एका तक्रारीत एपस्टीनवर अल्पवयीन मुलींचे फोटो चोरण्याचा आरोप लावला होता ते उघड झाले. तरीही पीडित आणि डेमोक्रेट खासदारांनी सार्वजनिक झालेले पुरावे अपूर्ण आहेत आणि अमेरिकन न्याय विभागाने एपस्टीनशी निगडीत कागदपत्रे, पुरावे टप्प्याटप्प्याने जारी करण्याच्या धोरणावर टीका केली आहे.