Myanmar Earthquake Muslim Death:म्यानमारमध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या शक्तिशाली भूकंपात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी(28 मार्च) आलेल्या 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा सर्वाधिक फटका नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम बांधवांना बसला. स्प्रिंग रिव्होल्यूशन म्यानमार मुस्लिम नेटवर्कच्या मते, या भूकंपात अनेक मशिदी कोसळल्या, ज्यामुळे 700 हून अधिक नमाजींचा जागीच मृत्यू झाला.
म्यानमारमधील मंडाले येथे झालेल्या भूकंपात हजारो लोकांचा बळी गेला. अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण 1700+ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या भूकंपामुळे 60 मशिदीही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. कोसळलेल्या सर्व मशिदी जुन्या असल्याची माहिती आहे.
नमाजींवर मशिदी कोसळल्या...स्प्रिंग रिव्होल्यूशन म्यानमार मुस्लिम नेटवर्कचे सदस्य तुन की यांनी सांगितल्यानुसार, शुक्रवारी मशिदी नमाजींनी भरलेल्या असताना अचानक भूकंप झाला. यामुळे अनेक मशिदी कोसळल्या, ज्यात शेकडो लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अनेक ऑनलाइन न्यूज पोर्टलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मशिदी कोसळताना आणि लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसतात. यातील अनेक मशिदी या ऐतिहासिक वास्तू होत्या, ज्या भूकंपाचे तीव्र धक्के सहन करू शकल्या नाहीत.
मृतांचा आकडा वाढणारसरकारी अहवालानुसार, मृतांची संख्या 1,700 हून अधिक झाली आहे, परंतु मशिदींमध्ये मारले गेलेले 700+ लोक या आकडेवारीत समाविष्ट आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भीषण आपत्तीनंतर बचाव दल आणि मदत संस्था वेगाने मदतकार्यात गुंतल्या आहेत. मात्र, म्यानमारमध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे मदतकार्यात अनेक अडथळे येत आहेत.