इस्लामाबाद : मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला होता, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे.‘वॉशिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तयब्बाने केला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, या खटल्याची स्थिती काय आहे, हे माहिती करून घेण्याचे आदेश मी माझ्या सरकारला दिले आहेत. या खटल्याचा लवकर निकाल होणे आमच्याही हिताचे आहे. कारण हा अतिरेकी हल्ला होता. मुंबई अतिरेकी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयात लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर झकिऊर रेहमान लखवी याच्यासह सात संशयितांविरुद्ध खटला भरण्यात आला असला, तरी या खटल्याचे काम ठप्प आहे. भारताने आणखी पुरावे द्यायला हवेत, अशी पाक अधिकाऱ्यांची भूमिका आहे. मात्र, इम्रान खान यांच्या या वक्तव्यामुळे या खटल्याला गती मिळण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत.
मुंबई हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला; इम्रान खानची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 06:12 IST