कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचरसंस्था ISI ची मदद करणाऱ्या मुफ्ती शाह मीर याची शुक्रवारी (9 मार्च) हत्या करणयात आली. हल्लेखोरांनी त्याला अत्यंत जवळून गोळ्या घातल्या. यानंतर शाह मीरला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
शाह मीर हा बलूचिस्तानातील एक प्रमुख मुफ्ती होता. त्याच्यावर यापूर्वीही दोन वेळा हल्ला झला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या नमाजनंतर, तुर्बतमध्ये एका स्थानिक मशिदीतून बाहेर पडताना दुचाकीवरून आलेल्या बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याला जवळूनच गोळ्या घालण्यात आल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला.
कोण होता मुफ्ती शाह मीर? -शाह मीर हा कट्टरपंथी पार्टी जमीयत उलेमा-ए-इस्लामचा (JUI) सदस्य होता. तो मुफ्ती पदाच्या नावाखाली शस्त्रास्त्रे आणि मानवी तस्करी करायचा. तसेच, आयएसआयलाही मदत करत होता. याशिवाय, या ठिकाणी भारत विरोधी योजना तयार केल्या जातात, अशा दहशतवादी छावण्यांनाही (पाकिस्तानातील) तो भेटी देत होता, यासंदर्भात बातम्याही आल्या आहेत. त्याच्यावर भारतात दहशतवादी घुसखोरीला प्रोत्साहन देण्याचाही आरोपही होता. मीर हा अफगाणिस्तानातही सक्रिय होता. तो तेथे पाकिस्तानी सैन्यासाठी गोपनीय माहिती जमवत होता. गेल्या आठवड्यातच बलुचिस्तानातील खुजदार शहरातही मीरच्या पार्टीतील दोन सदस्यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मात्र, या हत्यांमागे कुणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
असं आहे कुलभूषण जाधव प्रकरण... -भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव हे स्वेच्छा निवृत्ती घेऊन इराणमधील चाबहार येथे व्यवसाय करत होते. २०१६ मध्ये, त्याचे इराण-पाकिस्तान सीमेजवळून अपहरण करण्यात आले. यासाठी मुफ्ती शाह मीरने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला मदत केली होती. यानंतर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी सैन्याला सोपवण्यात आले. त्यांना २०१७ मध्ये पाकिस्तानातील एका न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यावर, भारताच्या अपीलानंतर, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 2019 मध्ये त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देत, पाकिस्तानला त्यांच्या शिक्षेची समीक्षा करण्यास आणि त्यांना कॉन्सुलर अॅक्सेस देण्यास सांगितले होते.