तुफान धुमश्चक्रीत १३२ हून अधिक जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 08:26 IST2025-10-31T08:25:44+5:302025-10-31T08:26:12+5:30
रिओ डी जेनेरियोच्या इतिहासात एखाद्या संघटित टोळीवर एवढी मोठी पोलिस कारवाई आजपर्यंत झालेली नव्हती.

(फोटो सौजन्य - Reuters)
रिओ डी जेनेरियो : शहरातील पेन्हा भागात आणि कॉम्प्लेक्सो डी अलेमाओ या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान तुफान धुमश्चक्रीत १३२ हून अधिक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर बुधवारी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी स्थानिक गव्हर्नर क्लॉडिओ कॅस्ट्रो यांचा तत्काळ राजीनामा मागितला आहे. रिओ डी जेनेरियोच्या इतिहासात एखाद्या संघटित टोळीवर एवढी मोठी पोलिस कारवाई आजपर्यंत झालेली नव्हती. कॅस्ट्रो यांच्या मते फोरेन्सिक चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर त्या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो, असे ते म्हणाले.
सर्वांत मोठी संघटित टोळी ही कारवाई ब्राझीलमधील सर्वांत कुख्यात व जुन्या समजल्या जाणाऱ्या 'कमांडो व्हर्मिलो' टोळीवर केली असून, या टोळीला पोर्तुगीज भाषेत 'रेड कमांड' या नावानेही ओळखले जाते. पोलिसांचे असे म्हणणे आहे, की जेथे कारवाई केली होती तेथून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी केली जायची व छाप्यात ड्रग्जचा मोठा साठा तसेच ४२ रायफली सापडल्या आहेत.