भारतीय तांदळावर आणखी टॅरिफ? भारताने आपला स्वस्त तांदूळ अमेरिकेत डम्प करू नये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 08:58 IST2025-12-10T08:57:58+5:302025-12-10T08:58:30+5:30
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा; भारताला तांदळाबाबत कोणतीही सूट नाही; भारताविरोधात असलेल्या खटल्याचीही केली चर्चा

भारतीय तांदळावर आणखी टॅरिफ? भारताने आपला स्वस्त तांदूळ अमेरिकेत डम्प करू नये
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : भारतीय तांदळावर आणखी शुल्क (टॅरिफ) लावण्याचा इशारा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. भारताने आपला स्वस्त तांदूळ अमेरिकेत ओतू (डम्प) नये; अन्यथा जास्त शुल्क लावून मला ही समस्या सोडवावी लागेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर याआधीच ५०% शुल्क लावले आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी शेतकरी प्रतिनिधी आणि मंत्र्यांसोबत व्हाईट हाऊसमध्ये गालमेज बैठक घेतली. ट्रम्प यांनी भारताच्या व्यापार पद्धतींबद्दलही प्रश्न उपस्थित केले. भारताला तांदळाबाबत सूट देण्यात आली आहे का, असे ट्रम्प यांनी विचारले. त्यावर अर्थमंत्री बेसेन्ट यांनी सांगितले की, ‘तशी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. भारतासोबतचा व्यापार करार अद्याप पूर्णच झालेला नाही.’ त्यावर ट्रम्प यांनी अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा इशारा दिला. भारताविरोधात जागतिक व्यापार संघटनेत सुरू असलेल्या एका खटल्याची चर्चाही यावेळी आली.
टॅरिफ लावले तरी भारतावर होणार नाही मोठा परिणाम
अमेरिकेने भारतीय तांदळावर टॅरिफ लावले तरी भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. तज्ज्ञांच्या मते, वित्त वर्ष २०२५ मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे ३९२ दशलक्ष डॉलरचा तांदूळ निर्यात केला.
भारताच्या एकूण तांदूळ निर्यातीच्या तुलनेत हा आकडा फारच छोटा आहे. आधीच अमेरिकेत मोठे टॅरिफ आहेत आणि नवीन शुल्काने मुख्यतः अमेरिकन ग्राहकांनाच तांदूळ महाग पडेल.
मागणी कायम राहणार
भारतीय निर्यातदार महासंघाने सांगितले की, भारतीय बासमतीची मागणी जगभर आहे. अमेरिकी बाजारही महत्त्वाचा आहे, परंतु भारताची निर्यात विविध बाजारांमध्ये आहे.
१९८.६५ लाख
टन इतका तांदूळ भारताने १ एप्रिल २०२४ ते २५ मार्च २०२५ या कालावधीत निर्यात केला आहे.
भारताची सर्वाधिक तांदूळ निर्यात कुठे? : बेनिन I सेनेगल I टोगो I गिनी I नायजेरिया I नेपाळ I बांगलादेश I व्हिएतनाम I संयुक्त अरब अमिराती I मलेशिया I भूतान I युरोप I लॅटिन अमेरिका