बांगलादेशात एअरबेसवर जमावाचा हल्ला, सैनिकांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:52 IST2025-02-24T15:34:49+5:302025-02-24T15:52:30+5:30
बांगलादेशच्या हवाई दलाच्या हवाई तळावर जमावाने हल्ला केला. हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने परिस्थिती हाताळावी लागली. सोमवारी सकाळी ११:३० च्या सुमारास हा हल्ला झाला.

बांगलादेशात एअरबेसवर जमावाचा हल्ला, सैनिकांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी
बांगलादेशच्या हवाई दलाच्या तळावर मोठा हल्ला झाला आहे. हे एअरबेस कॉक्स बाजार येथे आहे. हल्ला झाल्यानंतर लगेचच हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. हवाई दलाने केलेल्या कारवाईमध्ये अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
महाशिवरात्रीला १० लाख भाविक पशुपतिनाथ मंदिराला भेट देणार, प्रशासनाची जोरदार तयारी
बांगलादेश सशस्त्र दलाच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने सांगितले की, कॉक्स बाजारमधील हवाई दलाच्या तळाशेजारी असलेल्या समिती पारा येथील काही लोकांनी हा हल्ला केला. बांगलादेश हवाई दल कारवाईत करत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:३० वाजता हवाई दलाच्या जवानांनी निदर्शकांवर अनेक गोळीबार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, उपायुक्तांनी समिती पाराच्या लोकांना हवाई दलाचा परिसर सोडून खुरुष्कुल गृहनिर्माण प्रकल्पात जाण्याचे आदेश दिले होते. यानंतर लोकांच्या एका गटाने एअरबेसवर हल्ला केला.
या घटनेतील मृत तरुणाचे नाव शिहाब कबीर नाहीद असे आहे, तो तरुण समिती पारा येथील रहिवासी होता. कॉक्स बाजार सदर रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी साबुकतिगीन महमूद शोहेल यांनी सांगितले की, तरुणाला मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल.
गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या हिंसक निदर्शनांनंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. तीन दिवसांनंतर, ८ ऑगस्ट रोजी, मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशचा कार्यभार स्वीकारला. पण त्यांच्या राजवटीत बांगलादेश हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. देशातील ४८ जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर सुनियोजित हल्ले करण्यात आले. यानंतर महिला आणि मुलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या. आता एअरबेसवरील हल्ल्याचे प्रकरण समोर आले आहे.