"7 तास मृतदेहांच्या ढिगाऱ्यात लपून बसली..."; महिलेने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 09:55 IST2023-10-11T09:55:28+5:302023-10-11T09:55:44+5:30
Israel-Hamas conflict: म्यूझिक फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेने तिचा थरारक अनुभव सांगितला आहे. महिलेने मृतदेहांच्या ढिगाऱ्याखाली लपून आपला जीव वाचवला.

"7 तास मृतदेहांच्या ढिगाऱ्यात लपून बसली..."; महिलेने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
इस्रायलच्या दक्षिण भागात हमासने अचानक केलेल्या हल्ल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. इस्रायलमध्ये गेल्या शनिवारी एका म्यूझिक फेस्टिवलदरम्यान हमासने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 250 जणांचा मृत्यू झाला होता. या क्रूर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत आणि हमासचे हल्लेखोर त्यांच्यावर गोळीबार करत आहेत.
न्यूयॉर्क पोस्टनुसार, म्यूझिक फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेने तिचा थरारक अनुभव सांगितला आहे. महिलेने मृतदेहांच्या ढिगाऱ्याखाली लपून आपला जीव वाचवला. रिपोर्टनुसार, गोळीबाराच्या वेळी ली सासी आणि जवळपास 35 लोक एका बंकरमध्ये लपले होते. मात्र हमासच्या सैनिकांनी त्यांना पाहिलं आणि गोळीबार सुरू केला. मात्र, इस्त्रायली सैन्याने त्यांची सुटका केली तोपर्यंत त्या बंकरमध्ये फक्त 10 लोक जिवंत राहिले होते.
महिलेने सांगितलं की, हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या मृतदेहाखाली लपून बसून आपला जीव वाचवला आहे. सासीने नंतर इन्स्टाग्रामवर तिची मैत्रीण नताशा रेचेल गुटमॅनला अंगावर काटा आणणारी गोष्ट सांगितली आहे. गाझाजवळील किबुत्झ रीम येथे आयोजित म्यूझिक फेस्टिवलमध्ये हजारो तरुण सहभागी झाले होते. हल्लेखोर मोटारसायकल, पिकअप ट्रक, स्पीड बोट आणि ग्लायडरवरून इस्रायलच्या हद्दीत घुसले.
हमास दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने मंगळवारी सांगितलं की, त्यांनी आपल्या दक्षिणेकडील क्षेत्रावर आणि गाझा पट्टीच्या सीमेवर पुन्हा प्रभावी नियंत्रण मिळवलं आहे. हमासच्या सैनिकांनी शनिवारी इस्रायलमध्ये प्रवेश केला आणि इस्रायली नागरिक आणि सैनिकांवर क्रूर हल्ला केला तेव्हा इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी किमान 3,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि हजारो लोक जखमी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.