मर्कटलीला! एका माकडाने केली संपूर्ण श्रीलंकेतील बत्ती गुल, जाणून घ्या कसा संपूर्ण देश बुडाला अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:31 IST2025-02-11T12:30:59+5:302025-02-11T12:31:33+5:30
Sri Lanka News: माकड हा माणसाशी बऱ्यापैकी साधर्म्य असलेला प्राणी म्हणून ओळखला जातो. बऱ्याचदा या माकडांकडून केल्या जाणाऱ्या मर्कटलीलांमुळे मनोरंजनही होतं. मात्र कधीकधी या माकडांच्या उचापतींमुळे काही समस्याही निर्माण होतात. अशीच एक घटना श्रीलंकेमध्ये घडली आहे.

मर्कटलीला! एका माकडाने केली संपूर्ण श्रीलंकेतील बत्ती गुल, जाणून घ्या कसा संपूर्ण देश बुडाला अंधारात
माकड हा माणसाशी बऱ्यापैकी साधर्म्य असलेला प्राणी म्हणून ओळखला जातो. बऱ्याचदा या माकडांकडून केल्या जाणाऱ्या मर्कटलीलांमुळे मनोरंजनही होतं. मात्र कधीकधी या माकडांच्या उचापतींमुळे काही समस्याही निर्माण होतात. अशीच एक घटना श्रीलंकेमध्ये घडली आहे. श्रीलंकेमध्ये एका माकडाने केलेल्या उचापतीमुळे संपूर्ण श्रीलंका अंधारात बुडाली. हे नेमकं कसं घडलं याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे.
याचं झालं असं की, एक माकड वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य ग्रिडमध्ये घुसला. तिथे त्याने ट्रान्सफॉर्मरमध्ये काहीतरी गडबड केली. त्यामुळे श्रीलंकेतील बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर हा वीजपुरठा सुरळीत करण्यासाठी तंत्रज्ञांना खूप मेहनत घ्यावी लागली.
काही ठिकाणी तीन तासांनंतर वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला. तर देशभरातील वीजपुरवठा अद्याप पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेला नाही. अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, श्रीलंकेमधील एका वीज उपकेंद्रामध्ये माकड घुसल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
श्रीलंकेतील स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्यास सुरुवात झाली. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि तंत्रज्ञांना या गोंधळाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी हा बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले. काही परिसरात तीन तासांनंतर हा बिघाड दुरुस्त झाला.
श्रीलंकेचे उर्जामंत्री कुमारा जयकोडी यांनी सांगितले की, एक माकड आमच्या ग्रिड ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आला. त्यामुळे सिस्टिममध्ये गडबड झाली. ही घटना श्रीलंकेतील कोलंबोच्या दक्षिणेतील भागातील एका उपनगरामध्ये घडली.