लॉकडाऊनमध्ये चक्क केएफसीची तस्करी; कारवाई करणाऱ्या पोलिसांनी डोक्यावर हात मारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:22 IST2021-09-22T15:19:34+5:302021-09-22T15:22:06+5:30
लॉकडाऊन असल्यानं शहरातील रेस्टॉरंट्स बंद; तब्बल १२० किलोमीटरवरून आणलं चिकन

लॉकडाऊनमध्ये चक्क केएफसीची तस्करी; कारवाई करणाऱ्या पोलिसांनी डोक्यावर हात मारला
ऑकलंड: न्यूझीलंड पोलिसांनी दोघांना तस्करी प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी दोघांकडून केएफसी चिकन आणि मोठी रोकड जप्त केली आहे. देशात लागू असलेल्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं भंग केल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. केएफसी चिकन घेऊन दोघे जण ऑकलंडमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. ऑकलंडमध्ये सध्या कठोर लॉकडाऊन सुरू असून चौथ्या स्तराचे निर्बंध लादू आहेत.
ऑकलंडमधील हॉटेल, रेस्टॉरंट्स सध्या बंद आहेत. हॉटेलमधून घरी पार्सल नेण्यासही परवानगी नाही. मात्र दोन तरुण केएफसी चिकन आणण्यासाठी ऑकलंडहून १२० किलोमीटर दूर असलेल्या हॅमिल्टनला गेले होते. दोघे कारनं शहराबाहेर आले असताना पोलिसांना संशय आला. 'ग्रॅव्हेल रोडवर पोलिसांची कार पाहताच दोघांनी यू-टर्न घेतला आणि पोलीस तपासणी चुकवण्यासाठी कार वेगानं पळवली,' अशी माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली.
अमृताप्रमाणे घेतला जातोय बकरीच्या दूधाचा शोध; १६०० रुपये मोजूनही मिळेना; पण झालंय तरी काय..?
पोलिसांनी कारचा पाठलाग करत दोघा तरुणांना रोखलं. त्यांच्या कारची झडती घेण्यात आली. त्यावेळी पोलिसांच्या हाती मोठी रोकड आणि केएफसीची बरीच पार्सल्स लागली. कारमधून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये ३ चिकन बकेट्स, १० कप कोलेस्लॉ (सलाड), फ्राईजचं मोठं पॅकेट आणि केएफसीचे पदार्थ असलेल्या इतर चार मोठ्या बॅगांचा समावेश आहे. याशिवाय कारमधून १ लाख न्यूझीलंड डॉलरदेखील पोलिसांनी जप्त केले आहेत.