कधीच सोडून न जाणारी ‘गर्लफ्रेंड’ मिळणार, मोजावे लागणार फक्त १.५ कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 06:51 IST2025-01-13T06:49:37+5:302025-01-13T06:51:02+5:30
एआय कंपॅनियन टूल्सनंतर, एआय रोबोट ‘गर्लफ्रेंड’देखील तयार करण्यात आली आहे. त्याची वैशिष्ट्ये मानवासारखी आहेत. ‘आरिया’ ही रोबोट ‘गर्लफ्रेंड’ विशेषतः सहवास आणि जवळीकतेसाठी डिझाइन केलेली आहे.

कधीच सोडून न जाणारी ‘गर्लफ्रेंड’ मिळणार, मोजावे लागणार फक्त १.५ कोटी रुपये
लास वेगास : सध्याच्या तरुणांना गर्लफ्रेंड असणे, ही मिरवण्याची गोष्ट आहे. प्रत्येकाचीच इच्छा पूर्ण होते असे नाही. त्यातून मग ब्रेकअपला सामोरे जावे लागते; पण आता ब्रेकअपचा त्रास संपला! एआयने ‘आरिया’ ही रोबोट ‘गर्लफ्रेंड’ या तुमच्यासाठी बनवली आहे.
एआय कंपॅनियन टूल्सनंतर, एआय रोबोट ‘गर्लफ्रेंड’देखील तयार करण्यात आली आहे. त्याची वैशिष्ट्ये मानवासारखी आहेत. ‘आरिया’ ही रोबोट ‘गर्लफ्रेंड’ विशेषतः सहवास आणि जवळीकतेसाठी डिझाइन केलेली आहे.
‘आरिया’साठी किती खर्च करावा लागेल?
कंपनीने आरियाच्या तीन आवृत्त्या लाँच केल्या आहेत. एका प्रकारात, फक्त मानेचा वरचा भाग उपलब्ध असेल. यासाठी १०,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे ८ लाख ६० हजार रुपये खर्च करावे लागतील. दुसरे मॉड्युलर आवृत्ती आहे. त्याची किंमत १ कोटी २९ लाख रुपये आहे. तर तिसरा पर्याय पूर्ण आकाराचे मॉडेल आहे, ज्याची किंमत सुमारे १ कोटी ५० लाख रुपये आहे.
निर्मिती कशासाठी? : एकाकीपणा दूर करणे, एक रोमँटिक साथीदार म्हणून ही निर्मिती केल्याचे रिअलबोटिक्सचे सीईओ अँड्र्यू किगुएल यांनी दिली.
‘आरिया’ची वैशिष्ट्ये कोणती?
अमेरिकन कंपनी रिअलबोटिक्सने यावर्षी हा एआय रोबोट लास वेगासमधील २०२५च्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये लाँच केला आहे. ही कंपनी जिवंत माणसांसारखी सामाजिक बुद्धिमत्ता आणि वैशिष्ट्ये असलेले रोबोट तयार करते.
आरियाच्या संपूर्ण शरीरात १७ मोटर्स बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तिला मान फिरवण्यास आणि इतर हालचाली करण्यास मदत होते. आरियाचा चेहरा, केसांचा रंग आणि केशरचनादेखील कस्टमाइज करता येते.
रोबोट्समध्ये आर.एफ.आय.डी. टॅग्ज जोडलेले आहेत, ज्यामुळे तिने कोणता चेहरा धारण केला आहे याचा अंदाज लावू शकते. या आधारावर ती तिच्या हालचाली आणि व्यक्तिमत्त्वात बदल करते.