राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीपूर्वी वॉशिंग्टनमध्ये भव्य मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 08:15 IST2025-01-19T08:10:07+5:302025-01-19T08:15:21+5:30
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्याच्या दोन दिवसांपूर्वी आयोजित मोर्चाला ‘पीपल्स मार्च’ असे नाव दिले आहे.

राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीपूर्वी वॉशिंग्टनमध्ये भव्य मोर्चा
वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे तब्बल आठ वर्षांपूर्वी ऐतिहासिक महिला मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर प्रथमच देशभरातील महिला मोर्चासाठी वॉशिंग्टन येथे एकत्र येत आहेत. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्याच्या दोन दिवसांपूर्वी आयोजित मोर्चाला ‘पीपल्स मार्च’ असे नाव दिले आहे.
नोव्हेंबरमधील निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यामुळे नाराज झालेल्या पुरोगामी विचारांच्या संघटनांनी एकत्र येत हा मोर्चा आयोजित केला आहे. स्त्रीवाद, वांशिक न्याय,यासह विविध मुद्द्यांना प्रोत्साहनासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोक मोर्चात सहभागी होण्याचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)
२०१७ मध्ये अनेक शहरांत काढला होता मोर्चा
यापूर्वी २०१६ रोजी ट्रम्प देशाचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर २०१७ साली वॉशिंग्टन येथे एकत्र येत महिलांनी भव्य मोर्चा काढला होता. वॉशिंग्टनसह देशातील प्रमुख शहरांमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर लोकांचा पाठिंबा मिळण्यासाठी आयोजित केलेल्या मोर्चाला ‘महिला मार्च’ म्हणून ओळखले जावू लागले. मोर्चासाठी एकट्या वॉशिंग्टन शहरात ५० हजारांहून अधिक लोक एकत्र आले होते. त्यामुळे अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील हे आंदोलन सर्वात मोठ्या निदर्शनापैकी एक ठरले होते. हा विक्रम शनिवारी मोडीत निघू शकतो.