अमेरिकेतील टेक्सास राज्यात शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे अचानक पूर आला आणि त्यात ५१ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ग्वाडालुपे नदीला पूर आल्यामुळे ही भीषण स्थिती निर्माण झाली. या मृतांमध्ये १५ लहान मुलांचाही समावेश आहे, तर अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत.
ग्वाडालुपे नदीच्या आजूबाजूच्या भागात केवळ काही तासांत इतका पाऊस झाला, जितका एका महिन्यात होतो. त्यामुळे नदीची पातळी २९ फूटाने वाढली आणि आसपासच्या परिसरात पाणी पसरले.
कॅम्पमधील मुली बेपत्ताया पुरामुळे ‘कॅम्प मिस्टिक’ या समर कॅम्पमध्ये असलेल्या २७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. मृतांपैकी ८ जणांची ओळख अजून पटलेली नाही, त्यात तीन लहान मुलेही आहेत. सरकारकडून सांगण्यात आले आहे की, बचाव पथके वेगाने काम करत असून आतापर्यंत सुमारे ८५० लोकांना वाचवण्यात आले आहे.
हवामान खात्याचा अंदाज गडबडलाअमेरिकेच्या गृह सुरक्षा मंत्री क्रिस्टी नोएम यांनी सांगितले की, "हवामान खात्याने केवळ मध्यम पावसाचा इशारा दिला होता, पण इतकी मुसळधार व अतिवृष्टी होईल, याचा अंदाज वर्तवलेला नव्हता. त्यामुळे लोकांना वेळेत सावध करता आलं नाही."
आपत्ती जाहीरनाम्यावर ट्रम्प स्वाक्षरी करणारटेक्सासचे राज्यपाल ग्रेग अॅबॉट यांनी सांगितले की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपत्ती जाहीर करण्याची विनंती केली आहे. या घोषणेमुळे केंद्र सरकारकडून पूरग्रस्तांना मदत मिळू शकते.
हवामान खात्यातील कर्मचाऱ्यांची कपातही कारण?NOAA या हवामान संस्थाचे माजी प्रमुख रिक स्पिनराड यांनी म्हटले की, सरकारने हवामान विभागातील हजारो लोकांना कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे काही कार्यालयांत कर्मचारीच नाहीत. त्यामुळे वेळेवर पूराचा अंदाज देता न आल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.