नायजेरियात भीषण स्फोट, डझनभर इमारती उध्वस्त; आठ ठार, ७७ जखमी, १०० बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 14:29 IST2024-01-18T14:29:05+5:302024-01-18T14:29:22+5:30
स्फोटानंतर इमारतींचे अवशेष विखुरलेले आहेत. बचावकार्य सुरु झाले असून मलब्याखाली अडकलेल्या लोकांची शोधाशोध सुरु आहे.

नायजेरियात भीषण स्फोट, डझनभर इमारती उध्वस्त; आठ ठार, ७७ जखमी, १०० बेपत्ता
नायजेरियाच्या ओयो प्रांतामध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. यामुळे आजुबाजुच्या जवळपास डझनभर इमारती कोसळल्या असून कमीतकमी ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटात ७७ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. नायजेरियाची आर्थिक राजधानी लागोसपासून १३० किमी दूर इदाबानमध्ये हा स्फोट झाला आहे. शंभरावर लोक बेपत्ता असल्याचे एपीने म्हटले आहे.
स्फोटानंतर इमारतींचे अवशेष विखुरलेले आहेत. बचावकार्य सुरु झाले असून मलब्याखाली अडकलेल्या लोकांची शोधाशोध सुरु आहे. मलब्याखाली आणखी लोक अडकले किंवा मृत झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ओयोच्या दाट लोकवस्ती असलेल्या इबादान शहरात मंगळवारी रात्री स्फोट झाला. त्यानंतर मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे, असे ओयोचे गव्हर्नर सेई मोकिंदे यांनी सांगितले. बेकायदेशीर खाणकामासाठी येथे स्फोटकांचा साठा करण्यात आला होता, त्याचा मोठा स्फोट झाला, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. गव्हर्नरनी जखमींना मोफत उपचार आणि ज्यांची घरे कोसळली त्यांना तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्याची हमी दिली आहे.
नायजेरिया हा खनिज समृद्ध देश आहे. यामुळे तिथे अवैधरित्या खाणकाम नेहमीचे झाले आहे. खाणी दुर्गम भागात असल्या तरी यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर वस्तू लोकवस्तीच्या भागात ठेवण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री कोणी गोळा केली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.