मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 14:39 IST2025-12-12T14:35:52+5:302025-12-12T14:39:06+5:30
OpenAI ChatGPT:एआय क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओपनएआयच्या चॅटजीपीटीमुळे एका ५६ वर्षीय व्यक्तीने त्याच्या वृद्ध आईची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
एआय क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओपनएआयच्या चॅटजीपीटीमुळे एका ५६ वर्षीय व्यक्तीने त्याच्या वृद्ध आईची हत्या करून स्वत: आत्महत्या केली. याप्रकरणी मृतांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी आता ओपनएआय कंपनीला न्यायालयात खेचले असून त्यांच्याविरुद्ध कॅलिफोर्निया सुपीरियर कोर्टात खटला दाखल केला आहे. चॅटजीपीटीने मुलाला चिथावल्यामुळे त्याने आधी आईची हत्या केली, मग स्वत:ही टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया सुपीरियर कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुझान अॅडम्स (वय, ८३) आणि त्यांचा मुलगा स्टीन-एरिक सोएलबर्ग (वय, ५६) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, ३ ऑगस्ट २०२५ रोजी स्टीन-एरिक सोएलबर्ग त्याच्या आईला मारहाण केली. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर स्टीन-एरिक सोएलबर्गने स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी चॅटजीबीटीविरुद्ध खटला दाखल केला. नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत असे नमूद केले की, चॅटजीपीटीने स्टीन-एरिक सोएलबर्ग याच्या मनात त्याच्या आईबद्दल आणि आजूबाजूच्या लोकांबद्दल भ्रम निर्माण झाला. चॅटजीपीटीने सोएलबर्गला सांगितले की, तो त्याच्या आयुष्यात चॅटजीपीटी शिवाय कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मनात इतर लोकांबद्दल द्वेष निर्माण झाला. त्याची आई त्याच्यावर पाळत ठेवत आहे. तसेच डिलिव्हरी ड्रायव्हर्स, दुकानदार, पोलीस अधिकारी आणि अगदी त्याचे मित्रही त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत, असेही चॅटजीपीटीने त्याला सांगण्यात आले.
चॅटजीपीटीमुळे एखाद्या व्यक्तीने गुन्हेगारी पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. ओपनएआय कंपनीला सध्या अशाच प्रकारच्या इतर सात खटल्यांना तोंड देत आहे, ही अत्यंत भीतीदायक बाब आहे. चॅटजीपीटी लोकांना मानसिक आरोग्य समस्या नसतानाही आत्महत्येच्या आणि जीवघेण्या गोष्टींना प्रवृत्त करत आहे, असा दावा या खटल्यांमध्ये करण्यात आला आहे.