मालदीवने केले भारताचे कौतुक, एका झटक्यात मुइज्जू सरकारचा सूर बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 21:52 IST2024-08-17T21:45:39+5:302024-08-17T21:52:10+5:30
गेल्या काही महिन्यापूर्वी भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये संबंध बिघडले होते. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या तीन दिवसांच्या भेटीनंतर द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत.

मालदीवने केले भारताचे कौतुक, एका झटक्यात मुइज्जू सरकारचा सूर बदलला
गेल्या काही महिन्यापूर्वी मालदीव आणि भारताचे संबंध बिघडले होते. यामुळे भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणे टाळले होते, यामुळे मालदीवला मोठा फटका बसला होता. यानंतर मालदीव आता यातून सावरला आहे. मालदीव आता भारताचे कौतुक करत आहे. मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठी आणि सर्वात वैविध्यपूर्ण लोकशाही म्हणून उदयास आला आहे, ज्याने आपल्या देशांसह अनेक देशांना प्रेरणा देणारे उदाहरण ठेवले आहे. आपली भागीदारी लोकांमध्ये रुजलेली आहे आणि आमच्या सक्रिय द्विपक्षीय सहकार्यामुळे ती अधिक मजबूत झाली आहे.
"ममता बॅनर्जींचा लक्ष हटवण्याचा प्रयत्न, राजीनामा द्यावा"; निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या तीन दिवसांच्या भेटीनंतर अलीकडेच द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चीन-समर्थक मुइझ्झू यांनी शपथ घेतल्यापासून भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले होते. एस जयशंकर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला मालदीवला भेट दिली होती आणि राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांच्यासह देशातील सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली होती. तत्पूर्वी, मुइज्जू जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्लीत आले होते. यावेळी, काही काळापूर्वी मुइज्जूने भारताकडे आपल्या लष्करी जवानांना त्यांच्या देशातून काढून घेण्याची मागणी केली होती. परस्पर चर्चेनंतर, भारताने १० मे च्या अंतिम मुदतीपर्यंत आपले जवान मागे घेतले.
भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मालदीवचे परराष्ट्र मंत्री जमीर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे हा सन्मान आहे असे सांगून जमीर यांनी राष्ट्रपती मुइज्जू, सरकार आणि मालदीवच्या जनतेच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि भारतातील जनतेला शुभेच्छा दिल्या.