जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 22:30 IST2025-10-14T22:26:29+5:302025-10-14T22:30:10+5:30
Madagascar: नेपाळपाठोपाठ आता आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बेट राष्ट्र मादागास्करमध्ये 'जनरल झेड'च्या आंदोलनामुळे विद्यमान सरकार कोसळले.

जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
नेपाळपाठोपाठ आता आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बेट राष्ट्र मादागास्करमध्ये 'जनरल झेड'च्या आंदोलनामुळे विद्यमान सरकार कोसळले. राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्याविरोधात अनेक महिने चाललेल्या निदर्शनांनंतर आणि राष्ट्रीय सभेच्या महाभियोग प्रस्तावानंतर ते देश सोडून पळून गेले. त्यानंतर लगेचच मंगळवारी लष्कराने देशाची सूत्रे हाती घेतल्याची घोषणा केली.
एलीट कॅपसॅट युनिटचे कमांडर कर्नल मिशेल रँड्रियानिरिना यांनी राष्ट्रीय रेडिओवर बोलताना सांगितले की, राष्ट्रपतींच्या पलायन आणि महाभियोग मतदानामुळे लष्कराने देशाची सूत्रे हाती घेतली. लष्कराने संसदेच्या कनिष्ठ सभागृहाव्यतिरिक्त सर्व संस्था बरखास्त केल्या आहेत. नागरी सरकार स्थापन करण्यासाठी लवकरच पंतप्रधान नियुक्त केला जाईल, अशी घोषणा लष्कर आणि जेंडरमेरी अधिकाऱ्यांच्या परिषदेने केली.
दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी अनियमित पाणी आणि वीज पुरवठ्यावरून सुरू झालेले हे आंदोलन लवकरच भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि गरिबीकडे सरकारच्या दुर्लक्षाविरुद्ध देशव्यापी चळवळीत रूपांतरित झाले. लष्कराची एक तुकडीही या आंदोलनात सहभागी झाल्याने परिस्थिती चिघळली. लष्कराच्या या तुकडीने राष्ट्रपती तसेच मंत्र्यांनी पद सोडावे, अशी मागणी केली, तसेच आंदोलकांवर गोळीबार करण्यास लष्कराने नकार दिला. मादागास्करच्या लोकसंख्येपैकी जवळपास तीन चतुर्थांश लोक गरिबीत जीवन जगत असून तरुणांमधील बेरोजगारी आणि विस्थापनातून हा असंतोष उफाळून आला. एका निदर्शकाने "जर मादागास्करच्या मुलांना अंधारात शिक्षण घेण्यास भाग पाडले गेले तर देशाचे भविष्य कोण उजळवेल?" असा प्रश्न उपस्थित केला.
राजधानीतील निदर्शकांना पांगवण्याऐवजी, २००९ च्या सत्तापालटात राजोएलिनाला सत्तेवर आणणारी एलीट लष्करी तुकडी कॅपसॅट देखील त्यांच्या विरोधात गेली आणि निदर्शकांचे संरक्षण करू लागली. पोलीस आणि निमलष्करी दलांनीही सरकारशी संबंध तोडल्यामुळे संकटाचे मोठे वळण आले.
या ऐतिहासिक सत्तापालटावर फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह आंतरराष्ट्रीय समुदायाने संवैधानिक सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. १६ वर्षांपूर्वी राजोएलिनाला सत्तेवर आणणाऱ्या त्याच लष्करी तुकड्यांनी आता त्यांना पदच्युत केल्याची नोंद मादागास्करच्या राजकीय इतिहासात झाली.