अमेरिकेत शटडाउनमुळे अन्न वितरण केंद्रावर मोठ्या रांगा; दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:55 IST2025-11-03T13:54:34+5:302025-11-03T13:55:00+5:30
महत्त्वाच्या संस्था बंद; शटडाउनला १ महिना पूर्ण

अमेरिकेत शटडाउनमुळे अन्न वितरण केंद्रावर मोठ्या रांगा; दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी
लुईसव्हिले : अमेरिकेत डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन यांच्यातील तिढा न संपल्यामुळे शटडाउनचे परिणाम दिसू लागले आहेत. शनिवारी अमेरिकेच्या कृषी खात्याने पूरक पोषण साहाय्य योजनेला दिला जाणारा निधी थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमेरिकेत अनेक ठिकाणी मोफत अन्न मिळणारी ठिकाणे, किराणा मालाची दुकाने, सरकारी धान्य वितरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर रांगा दिसू लागल्या. पूरक पोषण खात्याचा लाभ अमेरिकेतील सुमारे ४ कोटी २० लाख नागरिकांना होतो.
आता ही योजना पैसे नसल्यामुळे बंद केल्याने खासगी अन्न वितरण केंद्रे, चर्च किंवा स्वयंसेवी संघटनांच्या मदतीवर सामान्य नागरिकांना अवलंबून राहावे लागणार आहे. कृषी खात्याच्या या निर्णयाला एका न्यायालयाने स्थगिती आणण्याचा निर्णय दिला आहे, पण त्याबाबत स्पष्ट वृत्त नाही. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने नागरिकांच्या डेबिट कार्डमध्येही अद्याप पैसे जमा केलेले नाहीत.
महत्त्वाच्या संस्था बंद
शटडाउनमध्ये आर्थिक कात्री लावल्याने राष्ट्रीय संग्रहालये, राष्ट्रीय ग्रंथसंग्रहालये, राष्ट्रीय सांस्कृतिक दालने अनिश्चित काळासाठी बंद ठेवावी लागतात.
सरकारी संकेतस्थळे किंवा सार्वजनिक सेवा यांच्यावरही परिणाम होतो. फक्त आणीबाणी परिस्थितीत काम करणारी सरकारी यंत्रणा कार्यरत राहते.
शटडाउनला १ महिना पूर्ण
अमेरिकेत सुमारे ७ लाख ३० हजार सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत. यांचा पगार अद्याप झालेला नाही. हजारो कर्मचाऱ्यांना सुटीवर पाठवले आहे.