गुंडांना 5 लाख देऊन बेवफा नव-याची केली धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 16:17 IST2017-01-14T15:56:01+5:302017-01-14T16:17:15+5:30
एका महिलेने विश्वासघात करणा-या आपल्या नव-याला भाड्याच्या गुंडांकडून बेदम चोप देऊन त्याला चांगली अद्दल घडवली आहे.

गुंडांना 5 लाख देऊन बेवफा नव-याची केली धुलाई
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 14 - एका महिलेने विश्वासघात करणा-या आपल्या पतीला भाड्याच्या गुंडांकडून बेदम चोप देऊन त्याला चांगली अद्दल घडवली आहे. पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील ही घटना आहे. आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय या महिलेला होता. यामुळे तिने पतीला अद्दल घडवण्यासाठी हा सर्व घटाटोप केला. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने तब्बल 5 लाख रुपये मोजून गुंडांना आपल्या पतीची धुलाई करायला सांगितले.
'एक्स्प्रेस ट्रिब्युन'ने दिलेल्या बातमीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी लुबना कमर रजा या महिलेला अटक केली आहे. 'आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असून ते आपला विश्वासघात करत आहे असा संशय लुबनाला होता. कारण तिचे पती घरी उशीरा रात्री येत असत. यावर त्या दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. ही गोष्ट तिने आपल्या मैत्रिणीला सांगितली. यावेळी तिच्या मैत्रिणीने नव-याला अद्दल घडवण्याची कल्पना सुचवली. व 'माझा नवरा तुझ्या नव-याला अद्दल घडवण्यासाठी गुंडांची व्यवस्था करू शकतो', असेही सांगितले.
लुबनाने पतीला अद्दल घडवण्यासाठी गुंडांना तब्बल 5 लाख रुपये दिले. यानंतर गुंडांनी घरात घुसून लुबनाच्या पतीला बेदम चोप दिला. घरात शिरताना काही अडचण येऊ नये म्हणून लुबनानेच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची चावीही गुंडांना आधीच दिली होती. सुरुवातीला चौकशीदरम्यान पोलिसांना चोरीच्या उद्देशाने ही घटना घडली असावी, असे वाटले. मात्र चौकशीअंती या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. यात पीडित पतीच्या पत्नीचा म्हणजे लुबनाचाच हात असल्याचे सत्य समोर आले.