लखवीची तुरुंगात चैन
By Admin | Updated: March 1, 2015 23:34 IST2015-03-01T23:34:01+5:302015-03-01T23:34:01+5:30
मुंबईतील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर- ए- तैयबाचा कार्यवाहक कमांडर झकीऊर रेहमान लखवीची रावळपिंडीतील

लखवीची तुरुंगात चैन
इस्लामाबाद : मुंबईतील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर- ए- तैयबाचा कार्यवाहक कमांडर झकीऊर रेहमान लखवीची रावळपिंडीतील आदियाला तुरुंगातही चांगलीच ऐश चालली आहे. मोबाईल, इंटरनेटरच्या मनसोक्त वापरासह दरदिवशी अनेकांच्या भेटीगाठी घेण्यातही त्याला कसलीही आडकाठी नाही.
कडेकोट सुरक्षा असलेल्या आदियाल तुरुंगात लखवीसोबत अब्दुल वाजीद, मजहर इक्बाल, हमद अमीन सादिक, शाहीद जमील रियाझ, जमील अहमद व युनूस अंजुमन यांना डांबण्यात आले आहे. लखवीसह या सर्वांवर मुंबई हल्ल्याचा कट रचणे व हा कट तडीस नेण्याचा आरोप आहे. एवढे गंभीर आरोप असतानाही लखवी आणि त्याचे साथीदार तुरुंगात मौजमजा करीत आहेत.
तुरुंगाधिकाऱ्याच्या परवानगीने त्यांना टेलिव्हिजन, मोबाईल फोन व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नाही तर त्याला दरदिवशी कधी आणि कोणाचीही भेट घेता येते, असे बीबीसी उर्दूचे वृत्त आहे. लखवी कधीही आणि वाटेल त्याला भेटतो. यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. विशेष त्याला भेटणाऱ्यांना ओळख द्यायचीही गरज नाही. लखवी दरदिवशी १०० लोकांना भेटतो. हा प्रकार चकित करणारा वाटत असला तरी पाकिस्तानी प्रशासन तुरुंगातील अतिरेक्यांची भविष्यात गरज लागेल म्हणून त्यांचे चोचले पुरवीत असते. लखवी हा लष्कर- ए- तैयबा व जमात- ऊद- दावा या संघटनेचा संस्थापक हाफीज सईदचा जवळचा नातेवाईक असल्याचे समजते. (वृत्तसंस्था)