किंग चार्ल्स यांनी भावाला काढलं घराबाहेर! ब्रिटिश राजघराण्याला फासला गेला काळिमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:07 IST2025-11-04T11:07:32+5:302025-11-04T11:07:54+5:30
‘जेफ्री एप्स्टिन सेक्स स्कँडल’ हे आधुनिक काळातील सर्वांत मोठ्या आणि धक्कादायक गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक मानलं जातं...

किंग चार्ल्स यांनी भावाला काढलं घराबाहेर! ब्रिटिश राजघराण्याला फासला गेला काळिमा
होणार, होणार म्हणून ज्याचा कधीपासून अंदाज वर्तविला जात होता, ती ब्रिटनच्या राजघराण्यातील ऐतिहासिक घटना अखेर घडली आहे आणि त्यामुळे ब्रिटिश राजघराण्याला पुन्हा एकदा काळिमा फासला गेला आहे. ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स यांनी आपल्या लहान भावाकडून; अँड्र्यूकडून, ‘प्रिन्स’ हा किताब आणि त्यांच्या सगळ्या शाही पदव्याच परत घेतल्या नाहीत, तर त्यांना विंडसरमधल्या त्यांच्या आलिशान ‘रॉयल लॉज’ या घरातूनही बाहेर पडायचा आदेश दिलाय.
६५ वर्षीय अँड्र्यू यांचं नाव बऱ्याच काळापासून अमेरिकन गुन्हेगार जेफ्री एप्स्टिनसोबत जोडलं गेलं आहे. ‘जेफ्री एप्स्टिन सेक्स स्कँडल’ हे आधुनिक काळातील सर्वांत मोठ्या आणि धक्कादायक गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक मानलं जातं, कारण त्यात सत्ताधारी आणि प्रभावशाली व्यक्तींनी अनेक अल्पवयीन मुलींचं शोषण केलं होतं.
एप्रिल २०२५मध्ये आत्महत्या केलेल्या ४१ वर्षीय व्हर्जिनिया गिफ्रेनं प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तिचं म्हणणं होतं, ती १७ वर्षांची असताना २००१मध्ये प्रिन्स अँड्र्यूनं तिचं लैंगिक शोषण केलं होतं. त्याबद्दल तिनं प्रिन्स अँड्र्यू यांना कोर्टातही खेचलं होतं आणि त्याबद्दल अँड्र्यू यांनी तिला भलीमोठ्ठी रक्कमही दिली होती. ही रक्कम किती होती ते मात्र कळू शकलेले नाही. याशिवाय अँड्र्यू यांनी व्हर्जिनियाच्या धर्मादाय संस्थेलाही मोठं डोनेशन दिलं होतं.
या महिन्याच्या सुरुवातीला अँड्र्यू यांना ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ हा किताब वापरण्यावरही बंदी घातली गेली होती. बकिंगहॅम पॅलेसनं जारी केलेल्या निर्देशानुसार, शाही पदव्या काढून घेतल्यानंतर, शाही घर सोडावं लागल्यानंतर प्रिन्स अँड्र्यू यांना आता ‘अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर’ या नावानं ओळखलं जाईल. आतापर्यंत त्यांना ‘प्रिन्स अँड्र्यू ड्यूक ऑफ यॉर्क’ म्हणून ओळखलं जात होतं. ‘माउंटबॅटन-विंडसर’ हे नाव १९६० साली तयार करण्यात आलं होतं. हे नाव दिवंगत महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या आणि त्यांचे पती प्रिन्स फिलिप या दोघांच्या कौटुंबिक नावांपासून तयार करण्यात आलं आहे.
अँड्र्यू २००३पासून रॉयल लॉजमध्ये राहत होते. ३० खोल्यांचं हे आलिशान घर विंडसर परिसरात आहे. इथेच अँड्र्यू यांच्या माजी पत्नी सारा फर्ग्युसनही त्यांच्यासोबत राहायच्या. या दोघांचा १९९६ मध्ये घटस्फोट झाला होता. प्रिन्स चार्ल्स यांच्या आदेशामुळे फर्ग्युसन यांनाही आता रॉयल लॉज रिकामं करावं लागणार आहे. दोघांनाही राहण्यासाठी वेगळी, खासगी व्यवस्था करावी लागेल.
ब्रिटिश इतिहासात असं फार कमी वेळा घडलं आहे की, एखाद्या राजकुमार किंवा राजकुमारीकडून ‘प्रिन्स’ अथवा ‘प्रिन्सेस’ हा किताब काढून घेतला गेला आहे. याआधी १९१९मध्ये हॅनोव्हरचे प्रिन्स अर्नेस्ट ऑगस्टस यांचा ब्रिटिश किताब काढून घेतला गेला होता, कारण त्यांनी पहिल्या महायुद्धात जर्मनीला साथ दिली होती. आता शंभर वर्षांहून अधिक काळानंतर किंग चार्ल्सनं असं कठोर पाऊल उचललं आहे. गेल्या काही काळापासून ब्रिटिश राजघराण्यावर दबाव वाढत होता की, अँड्र्यू यांना त्यांच्या आलिशान रॉयल लॉज घरातून बाहेर काढावं. या प्रकरणामुळे अँड्र्यू यांना काही दिवसांपूर्वीच आपली ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ ही उपाधी सोडावी लागली होती.