Kim Jong Un: ...तर अमेरिका, द. कोरियावर अणुबॉम्ब टाकणार; किम जोंग उनची उघड धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 13:30 IST2022-07-28T13:30:04+5:302022-07-28T13:30:49+5:30
येत्या काळात उत्तर कोरियाकडून अमेरिका आणि द. कोरियाला धमक्यांचे प्रमाण वाढू शकते. दोन्ही देश सैन्याचा संयुक्त सराव करत आहेत. याकडे उ. कोरिया हल्ल्याच्या नजरेतून पाहत आहे.

Kim Jong Un: ...तर अमेरिका, द. कोरियावर अणुबॉम्ब टाकणार; किम जोंग उनची उघड धमकी
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अमेरिकेसह, द. कोरियावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याने पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. कोरियन युद्धाच्या समाप्तीला 69 वर्षे झाल्याच्या कार्यक्रमात सैन्याला संबोधित करताना त्याने ही धमकी दिली आहे.
किमने दावा केला आहे की, शत्रू राष्ट्रे कोरिया उपखंडाला युद्धाच्या तोंडात ढकलत आहेत. जर तसे झाले आणि युद्ध सुरु झाले तर आम्ही अमेरिका आणि द. कोरियावर अण्वस्त्र हल्ले करू, असे वक्तव्य केले आहे. देशात कोरोना महामारीमुळे आर्थिक संकट आहे, ते दूर करण्यासाठी देशांतर्गत एकतेला महत्व द्यायला हवे, यावर हे भाषण आधारित होते.
काही तज्ज्ञांनुसार येत्या काळात उत्तर कोरियाकडून अमेरिका आणि द. कोरियाला धमक्यांचे प्रमाण वाढू शकते. दोन्ही देश सैन्याचा संयुक्त सराव करत आहेत. याकडे उ. कोरिया हल्ल्याच्या नजरेतून पाहत आहे.
कोरियन सेंट्रल न्यूजनुसार आमचे सैन्य कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्य़ास समर्थ आहेत. आपल्याकडे आता अणुबॉम्बही आहेत. उत्तर कोरियाची वाईट प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. अमेरिका आम्हाला सैन्य सराव करून युद्धासाठी उकसवत असतो. तेच जगाला दाखवत असतो, असा आरोप किम याने केला आहे.