किम जोंग उनने जनरलला दिली अंगाचा थरकाप उडवणारी क्रूर शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 19:48 IST2019-06-11T19:48:35+5:302019-06-11T19:48:50+5:30
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा किरकोळ बाबींसाठी क्रूर शिक्षा सुनावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे

किम जोंग उनने जनरलला दिली अंगाचा थरकाप उडवणारी क्रूर शिक्षा
प्योंगयाँग - उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा किरकोळ बाबींसाठी क्रूर शिक्षा सुनावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. दरम्यान, किम जोंग उनच्या क्रौर्याची अशीच एक घटना समोर आली आहे. किम जोंगने एका जनरलला नरभक्षक पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकून मृत्युदंड दिल्याचे वृत्त आहे.
पिरान्हा मासे हे दक्षिण अमेरिकेत आढळतात. या माशांचे कळप त्यांच्या तीक्ष्ण दातांमुळे माणसालासुद्धा फाडून खाते. उत्तर कोरियाने हे मासे ब्राझीलमधून आयात केले होते. या माशांनी भरलेल्या टँकमध्ये फेकून या जनरला मृत्युदंड देण्यात आला.
मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आलेल्या जनरलवर सत्तापालट करण्याचा कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दरम्यान 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स बॉण्डच्या यू ओन्ली लिव्ह ट्वायसमधील घटनेचा आधार घेत या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. या चित्रपटात मृत्युदंडाची अशी क्रूर शिक्षा चित्रित करण्यात आली होती.
दरम्यान, उत्तर कोरियामधून याआधीही अधिकाऱ्यांना अशाप्रकारच्या क्रूर शिक्षा सुनावण्यात आल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या. मात्र काही वेळा अशा बातम्या खोट्या असल्याचेही समोर आले होते. तसेच मृत्युदंड दिल्याचा दावा करण्यात आलेले मृत अधिकारी काही काळाने सर्वांसमोर आले होते.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेशी वाटाघाटी निष्फळ ठरल्यानंतर किम जोंग याने 16 वरिष्ठ अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिल्याचे समोर आले होते.