Canada Khalistan: कॅनडामधील खलिस्तान समर्थक पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शिख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेने व्हॅनकुव्हरमध्ये असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासावर कब्जा करण्याची धमकी दिली आहे. SFJ ने भारतीय नागरिकांना त्या भागात न जाण्याचा इशाराही दिला. या प्रकरणावर अद्याप भारत किंवा कॅनडा सरकारने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारत-कॅनडा संबंधांवर नाराजी
अलीकडेच भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंध पुन्हा सुरू झाले. मात्र खलिस्तानी संघटना यामुळे अस्वस्थ झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, SFJ ने 18 सप्टेंबर (गुरुवार) रोजी व्हॅनकुव्हर येथील भारतीय वाणिज्य दूतावासाला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर भारतीयांना दूतावासाच्या परिसरात न जाण्याची धमकीही देण्यात आली आहे.
SFJ ने एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये कॅनडामधील नवे भारतीय उच्चायुक्त दिनेश पटनायक यांच्या चेहऱ्यावर बंदुकीच्या निशाण्याचे चिन्ह दाखवण्यात आले आहे. संघटनेने आपल्या प्रचार पत्रकात नमूद केले की, दोन वर्षांपूर्वी (18 सप्टेंबर 2023 रोजी) पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत सांगितले होते की, हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा सहभाग असल्याची चौकशी सुरू आहे. SFJ ला भीती आहे की, भारतीय वाणिज्य दूतावास खलिस्तान जनमत संग्रहाच्या प्रचारकांवर गुप्तहेरगिरी करत आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामात अडथळा येऊ शकतो.
कॅनडामध्ये खलिस्तान्यांना निधी कसा मिळतो?
या महिन्याच्या सुरुवातीला कॅनडा सरकारने एका आंतरिक अहवालात मान्य केले होते की, त्यांच्या देशात खलिस्तानी दहशतवादी संघटनांची उपस्थिती आहे. भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी निधी कसा मिळतो, याचाही उल्लेख अहवालात करण्यात आला होता. या संघटनांमध्ये बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल एसवायएफ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही संघटना कॅनडामध्ये अधिकृतपणे दहशतवादी संघटनांच्या यादीत आहेत.