Kathmandu all set to welcome Indian PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी काठमांडू सज्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी काठमांडू सज्ज

काठमांडू- दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असणाऱ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी नेपाळची राजधानी सज्ज असल्याचे वृत्त नेपाळमधील द हिमालयन टाइम्स या वर्तमानपत्राने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनकपूर भेटीनंतर आता नेपाळची राजधानी काठमांडू येथे जात आहेत. सकाळी त्यांनी जनकपूर येथे माता जानकीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते काठमांडूला जात आहेत.

याबाबत बोलताना नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते रामकृष्णा सुबेदी म्हणाले, नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि राष्ट्रीय तपासयंत्रणा विभाग सर्व ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी उतरले आहेत.
काठमांडूच्या मेट्रोपोलिटन वाहतूक पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी जनकपूरवरुन काठमांडूला सर्वात जवळच्या मार्गाने पोहोचतील. ते येण्यापुर्वी केवळ 10 मिनिटे रस्त्यांवरील वाहतूक थांबविण्यात येईल आणि वाहनचालकांना 10 ते 20 मिनिटांपर्यंत वाहतूक थांबवावी लागेल. इतर दिवासांच्या तुलनेत आज सकाळपासून काठमांडू शहरात वाहतूक रहदारी कमी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी महत्त्वाची ठिकाणे स्वच्छ करुन सुशोभित करण्यात आली आहेत. 

आता दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे जाणार असून तेथे नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची ते भेट घेणार आहेत तसेच ते उपराष्ट्रपती नंदा बहादूर पन यांचीही भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांच्याबरोबर शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा करतील. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान अनेक करारांवर स्वाक्षरी करतील अशी माहिती देण्यात येत आहे. तसेच 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेल्या अरुण 3 प्रकल्पाचे ते उद्घाटन करतील. या प्रकल्पातून 900 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण होणार आहे.
 

Web Title: Kathmandu all set to welcome Indian PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.