ठळक मुद्दे'एकजुटीने अमेरिकेला एकत्र आणण्याचे काम करुयात. एकजुटीशिवाय शांतता शक्य नाही. आमच्यासमोर अनेक कठीण परिस्थिती आहे. '
वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी आज शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात जो बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात जो बायडन म्हणाले, "एकजुटीने अमेरिकेला एकत्र आणण्याचे काम करुयात. एकजुटीशिवाय शांतता शक्य नाही. आमच्यासमोर अनेक कठीण परिस्थिती आहे. आपल्या देशाचे संविधान खूप मोठे आहे. आम्ही पुन्हा अमेरिकेला पुढे घेऊन जाऊया. शांती आणि युद्ध यामध्ये आम्ही सर्वांत पुढे आहोत. आम्ही एकत्र राहिलो तर कधीच अयशस्वी होऊ शकत नाही."
आजचा दिवस हा लोकशाहीचा दिवस आहे. देशाला दुरुस्त करण्याची गरज आहे. देशांतर्गत दहशतवादाला पराभूत करण्याची गरज आहे. कोरोना संकटामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनामुळे येणारे संकट मोठे आहे. तसेच, अमेरिकेचे सैन्य सशक्त, प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहेत, असे जो बायडन म्हणाले.
याचबरोबर, अमेरिकेत वर्णभेदाविरोधात आपल्याला लढाई लढायची आहे. अमेरिकेत विकास घडवण्यासाठी मेहनतीने काम करुया. मी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचेही अभिनंदन करतो. मी संपूर्ण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, असे जो बायडन म्हणाले. याशिवाय, कुणाबरोबरही भेदभाव होणार नाही. कॅपिटल हिलसारखा हिंसाचार पुन्हा होणार नाही. आपल्या सर्वांना एकमेकांची गरज आहे. सत्ता आणि लाभासाठी खूप काही खोटं बोललं गेले. ज्यांचे रोजगार गेले त्यांच्या कुटुंबीयांसाठी चिंतित आहे. सध्याची परीक्षेची वेळ आहे, त्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास जो बायडन यांनी यावेळी व्यक्त केला.
कमला हॅरिस यांनी घेतली उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ
कमला हॅरिस यांनी आज अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या कमला हॅरिस या पहिल्या महिला, पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या लॅटिन सदस्य न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर पदाची शपथ दिली. सोटोमेयर यांनीच जो बायडन यांना 2013 मध्ये उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ दिली होती. कमला हॅरिस यांनी दोन बायबल साक्षी ठेवून शपथ घेतली.
…ही तुमची वेळ आहे - बराक ओबामा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विट करत जो बायडन यांचं अभिनंदन केलं आहे. 'माझे मित्र जो बायडन तुमचं अभिनंदन…ही तुमची वेळ आहे,' असं ट्विट करत बराक ओबामा यांनी सोबत एक फोटो सुद्धा ट्विट केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची अनुपस्थिती
मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले. राजशिष्टाचार म्हणून ट्रम्प हे या सोहळ्याला उपस्थित राहणे अपेक्षित असते. मात्र ते अनुपस्थित राहिले.
दिग्गजांची उपस्थिती
जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेतील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यांच्यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन तसेच जॉर्ज बुश हे माजी राष्ट्राध्याक्षही उपस्थित होते.
कॅपिटल हिलमध्ये कडेकोट बंदोबस्त
जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता विचारात घेऊन या शपथविधी सोहळ्याला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी तब्बल ३५ हजार जवान तैनात करण्यात आले होते.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Joe Biden Swearing Ceremony : Peace is not possible without unity, Joe Biden determined to unite the United States
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.