बायडेन यांच्याकडून एच- १बी व्हिसाचे नियम शिथिल; भारतीयांसह विदेशींना नोकरी देणे सुलभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:49 IST2024-12-19T11:49:03+5:302024-12-19T11:49:30+5:30
त्यांची प्रक्रिया पार पाडण्यातही गतिमानता येईल.

बायडेन यांच्याकडून एच- १बी व्हिसाचे नियम शिथिल; भारतीयांसह विदेशींना नोकरी देणे सुलभ
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने जाता-जाता एच-१ बी व्हिसाचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अमेरिकी कंपन्यांना विशेष कौशल्याची गरज असलेल्या पदांसाठी विदेशी नागरिकांना नियुक्त्या देणे सुलभ होईल.
या निर्णयानंतर एफ-१ विद्यार्थी व्हिसाचे एच-१ बी व्हिसामध्ये सुलभतेने परिवर्तन होऊ शकेल. बायडेन सरकारच्या या निर्णयाचा हजारो भारतीय तंत्रज्ञांना लाभ मिळण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. अमेरिकेत सध्या सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे.
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २० जानेवारी रोजी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारतील. एच-१ बी व्हिसाचे नियम शिथिल करण्याची घोषणा अमेरिकी गृहमंत्रालयाने मंगळवारी केली. या व्हिसाच्या मर्यादांमध्ये सूट देण्यात येत आहे, असे गृहमंत्रालयाने म्हटले.
प्रक्रिया गतिमान होणार
एफ-१ व्हिसाधारक विद्यार्थ्यांना आपला व्हिसा एच-१ बी मध्ये रूपांतरित करून मिळेलच; पण त्याबरोबरच ज्यांच्या एच-१ बी व्हिसाला मंजुरी मिळालेली आहे, त्यांची प्रक्रिया पार पाडण्यातही गतिमानता येईल.