डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 07:55 IST2025-12-19T07:52:03+5:302025-12-19T07:55:30+5:30
डेमोक्रेट्सनी प्रसिद्ध केलेल्या या फोटोंमध्ये एपस्टीन अनेक प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्तींसोबत विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत

डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
वॉश्गिंटन - अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्सच्या डेमोक्रेट्सने गुरुवारी दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या कागदपत्रातील ६८ नवीन फोटो सार्वजनिक केले. हे फोटो जारी करण्यामागचा हेतू एपस्टीनचे किती प्रभावशाली व्यक्तींसोबत संबंध होते हे उघड करणे आहे. जारी केलेले फोटो हाऊस ओवरसाइट कमिटीने एपस्टीनच्या २०१९ मध्ये जेलमधील मृत्यूपूर्वीच जप्त केलेल्या ९५ हजार फोटोंपैकी काही आहेत.
डेमोक्रेट्सनी प्रसिद्ध केलेल्या या फोटोंमध्ये एपस्टीन अनेक प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्तींसोबत विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत. त्यात मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, फिल्ममेकर वुडी एलन, गूगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, फिलॉस्फर नोम चॉम्स्की आणि ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव बॅनन यांच्यासह अनेक लोक दिसत आहेत. जारी केलेल्या अनेक फोटोपैकी २ फोटोत बिल गेट्स महिलांसोबत नजरेस पडतायेत. त्याशिवाय न्यूयॉर्क टाईम्सचे कॉलमनिस्ट डेविड ब्रूक्सही या फोटोत दिसत आहेत. त्यानंतर न्यूयॉर्क टाईम्सने एक निवेदन जारी करत ब्रूक्स २०११ साली एका डिनरसाठी गेले होते. जे त्यांच्या कॉलमसाठी माहिती मिळवण्यासाठी तिथे गेले होते असं सांगितले आहे.
तर हे फोटो प्रकाशित करून कुठल्याही व्यक्तीद्वारे कुठलेही चुकीचे काम केल्याचे संकेत मिळत नाही. त्यातील अनेक फोटो एपस्टीनच्या परिचयातील व्यक्तींनी एखाद्या गुन्हेगारी कारवाईत सहभाग झाल्याचे दाखवत नाही. मात्र हे सर्व लोक एपस्टीनच्या संपर्कात होते हे स्पष्ट दिसते. हा खुलासा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या विधेयकानंतर काही दिवसांत झाला आहे. ज्यात न्याय विभागाने शुक्रवारपर्यंत एपस्टीन आणि घिसलेन मॅक्सवेल प्रकरणी फाईल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. या फोटोत काही खळबळजनक फोटोंचाही समावेश आहे. अनेक छायाचित्रांमध्ये व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या 'लोलिता' या कादंबरीतील काही वाक्ये एका महिलेच्या शरीराच्या विविध भागांवर लिहिलेले दिसतात. एका अस्पष्ट फोटोत नोबेल पुरस्काराच्या सुरुवातीच्या ओळी महिलेच्या छातीवर लिहिलेल्या आहेत.

दरम्यान, आणखी एका फोटोत महिलेच्या पायावर कांदबरीतील आणखी एक वाक्य लिहिलेले आहे. त्याशिवाय बॅकग्राऊंडला लोलिटा पुस्तकाची प्रतही दिसून येते. पीडित मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या फोटोतील चेहरे ब्लर करण्यात आले आहेत. एपस्टीनजवळ सापडलेल्या साहित्यात रशिया, युक्रेन, दक्षिण आफ्रिका, लिथुआनियासारख्या देशांचे पासपोर्ट, व्हिसा आणि ओळखपत्रे आढळली आहेत. सोबत एका अज्ञात व्यक्तीसोबत टेक्स्ट मेसेजचा स्क्रिनशॉट्सही जारी करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये मुली पाठवणे आणि १ हजार डॉलर प्रति मुलगी अशी किंमत असल्याचं म्हटले आहे. ज्यात रशियातील एक १८ वर्षीय मुलीची ओळख सांगण्यात आली आहे. जप्त केलेल्या साहित्यात आर्किटेक्चरल ब्लूप्रिंट्स, फेनाझोपायरीडिन औषधाची बाटली आणि महिलांचे फोटो देखील समाविष्ट होते.