जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 09:27 IST2025-12-12T09:26:59+5:302025-12-12T09:27:28+5:30
जपानमधील भूकंपाची तीव्रता ६.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १०.७ किलोमीटरवर होता.

जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
जपानमध्ये शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा जोरदार भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. आओमोरी येथील हाचिनोहे परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १०.७ किलोमीटरवर होता.
पॅसिफिक किनारपट्टीला त्सुनामीचा धोका
या तीव्र भूकंपानंतर जपान हवामानशास्त्र संस्थेनेतातडीने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. पॅसिफिक किनारपट्टीवर असलेल्या होक्काइडो आणि आओमोरी तसेच इवाते आणि मियागी प्रीफेक्चरसाठी हा इशारा देण्यात आला आहे. किनारी भागात राहणाऱ्या रहिवाशांना तातडीने अधिकृत सूचनांचे पालन करून सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे.
नुकसानीची माहिती अद्याप अस्पष्ट
६ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप विनाशकारी मानले जातात. मात्र, या भूकंपात झालेल्या जीवित किंवा वित्तहानीची कोणतीही नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे.
मागील आठवड्यातही मोठा धक्का
जपानमध्ये गेल्या आठवड्यातही ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला होता. त्या भूकंपांमुळे देशभरात मोठे नुकसान झाले होते, ज्यात ३० हून अधिक लोक जखमी झाले होते आणि सुमारे ९०,००० रहिवाशांना स्थलांतरित करावे लागले होते. या भागातील रेल्वे सेवाही तात्पुरत्या थांबवण्यात आल्या होत्या. जपान हवामानशास्त्र संस्था आज दुपारी १२:५० वाजता होणाऱ्या संभाव्य त्सुनामीवर पत्रकार परिषद घेणार आहे.