जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 20:35 IST2025-12-08T20:35:18+5:302025-12-08T20:35:56+5:30
Japan Earthquake: भूकंपाचा केंद्रबिंदू आओमोरी आणि होक्काइडो प्रांताच्या किनाऱ्याजवळ समुद्राखाली अंदाजे ५० किलोमीटरवर होता.

जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
Japan Earthquake: जपानच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ आज सोमवारी ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. या घटनेनंतर जपानच्या हवामान एजन्सीने (JMA) तातडीने ईशान्येकडील किनारपट्टी भागासाठी त्सुनामीचा इशारा जारी केला असून, ३ मीटर (सुमारे १० फूट) उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू आओमोरी आणि होक्काइडो प्रांताच्या किनाऱ्याजवळ समुद्राखाली अंदाजे ५० किलोमीटरवर होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, आओमोरी प्रांतात जपानच्या ७-बिंदू भूकंपाच्या तीव्रतेच्या स्केलवर ६+ तीव्रता नोंदवली गेली. या तीव्रतेमुळे भागातील लोकांना उभे राहणे आणि चालणेही कठीण झाले होते. जपान हवामान एजन्सीने किनारपट्टीवरील नागरिकांना क्षणभरही विलंब न करता तत्काळ सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
त्सुनामीचा इशारा जारी झाल्यानंतर सरकारी यंत्रणा अलर्टवर असून, सार्वजनिक प्रसारक NHK ने या भागातील सर्व नागरिकांना टीव्ही आणि रेडिओवरील सूचनांकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. विशेषतः, या भागातील अणुऊर्जा प्रकल्पांवर भूकंपाचा काही परिणाम झाला आहे का, याची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे. सध्यापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानीचे वृत्त नाही, मात्र संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन अत्यंत सावधगिरी बाळगत आहे.
जपान हा देश भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने येथे भूकंपाचे धक्के वारंवार जाणवतात. परंतु, ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा गंभीर मानला जातो, कारण अशा लाटा किनारी भागातील घरांचे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान करू शकतात. स्थानिक नागरिकांनी जुन्या आठवणी आणि नुकसानीचा धोका टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा इशारा रद्द होईपर्यंत लोकांनी किनाऱ्यापासून दूर राहावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.