जपानची 'आयर्न लेडी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:51 IST2025-10-26T13:51:25+5:302025-10-26T13:51:51+5:30
ताकाइची यांना स्कूबा डायव्हिंग आणि बाइक, कारचीही आवड आहे

जपानची 'आयर्न लेडी'
प्रज्ञा तळेगावकर
मुख्य उपसंपादक
जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाइची यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्या भाषणात जपानला अधिक उत्तम उंचीवर नेण्यासाठी प्रत्येक पिढीकडून सहकार्याची अपेक्षा केली. त्या म्हणाल्या, "देशाची प्रत्येक पिढी एकत्र येऊन जपानची पुनर्बाधणी करू शकते. हे करण्यासाठी, मी देशातील प्रत्येक पिढीला घोड्यासारखे (अतिशय वेगात) काम करण्याचे आवाहन करते. मी स्वतः काम करेन, अधिक काम करेन आणि उत्तम काम करेन."
ताकाइची यांचे हे वक्तव्य त्यांच्या धडाडीच्या स्वभावाचे, कर्तव्यकठोर वृत्तीचे एक द्योतक म्हणता येईल. यातूनच त्यांची 'जपानच्या आयर्न लेडी' म्हणून असलेली प्रतिमा अधिक उजळून निघते. त्या स्वतःला अजून 'जपानच्या आयर्न लेडी' मानत नाहीत. अलीकडील प्रचार मोहिमेदरम्यान ताकाइची यांनी शाळकरी मुलांना सांगितले होते, "माझे ध्येय आहे आयर्न लेडी बनणे." ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मागरिट थेंचर यांना त्या आदर्श मानतात. ताकाइची यांच्या कामाचा झपाटा पाहता, त्या 'जपानच्या आयर्न लेडी' होणे दूर नाही असे म्हणावे लागेल.
ड्रमर, स्कूबा डायवर, सूत्रसंचालक आणि....
ताकाइची यांचा जन्म १९६१ मध्ये नारा प्रीफेक्चरमध्ये झाला. त्यांचे वडील ऑफिसमध्ये कर्मचारी होते आणि आई पोलिस अधिकारी होती. तरुणपणी त्या एका बँडमध्ये ड्रम वाजवत असत. तेव्हा, त्या अनेक ड्रम स्टिक वापरण्यासाठी प्रसिद्ध होत्या. उत्स्फूर्त सादरीकरणांदरम्यान ड्रम स्टिक तुटत असल्यामुळे त्या नेहमी अनेक स्टिक जवळ बाळगत. त्या आजही 'आयर्न मेडेन' आणि 'डीप पर्पल' यांसारख्या हेवी मेटल बँडच्या चाहत्या आहेत. त्यांच्याकडे अजूनही घरी इलेक्ट्रिक ड्रम किट आहे. ताकाइची यांना स्कूबा डायव्हिंग आणि बाइक, कारचीही आवड आहे. त्यांची आवडती टोयोटा सुप्रा कार आता नारा येथील एका संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. राजकारणात येण्यापूर्वी, ताकाइची यांनी काही काळ टेलिव्हिजन होस्ट म्हणून काम केले.
"जपानच्या पुनर्बाधणीसाठी, मी देशातील प्रत्येक पिढीला घोड्यासारखे (अतिशय वेगात) काम करण्याचे आवाहन करते." या आवाहनामुळे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाइची यांची 'जपानच्या आयर्न लेडी' म्हणून असलेली प्रतिमा अधिक उजळून निघते.
राजकारणात येण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण...
ताकाइची यांच्या कुटुंबाचा आणि राजकारणाचा काही संबंध नव्हता. त्यांना राजकारणात येण्याची प्रेरणा १९८० च्या दशकात मिळाली. त्यावेळी अमेरिका आणि जपान यांच्यात व्यापारी तणाव वाढला होता. अमेरिकन लोकांचा जपानकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी अमेरिकन डेमोक्रॅट पक्षातील काँग्रेस सदस्या पॅट्रिशिया श्रेडर यांच्या कार्यालयात काम केले. श्रेडर या जपानवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध होत्या. अमेरिकेत असताना ताकाइचींना लक्षात आले की, "जोपर्यंत जपान स्वतःचे संरक्षण करू शकत नाही, तोपर्यंत त्याचे भवितव्य वरवरच्या अमेरिकन मतांवर अवलंबून राहील."
बालसंगोपन, वृद्धांची सेवा व मुलांचे शिक्षण यावर आग्रही
ताकाइची या विवाहानंतर महिलांना पतीचे आडनाव लावणे अनिवार्य नसावे, असा कायदा आणण्याच्या विरोधात होत्या. त्यांचा समलिंगी विवाहाच्या कायदेशीर मान्यतेलाही विरोध होता. मात्र, अलीकडच्या काळात त्यांची भूमिका काहीशी मवाळ झाल्याचे दिसून येते. ताकाइची म्हणतात, " बालसंगोपन, वृद्धांची सेवा किंवा मुलांच्या शिक्षणासंबंधी अडचणींमुळे कुणालाही करिअर सोडावे लागू नये. मला असा समाज घडवायचा आहे जिथे लोकांना आपली कारकीर्द पणाला लावावी लागणार नाही."
१९९२ पासून दहा वेळा खासदार म्हणून विजयी
१९९२ मध्ये ताकाइची यांनी पहिल्यांदा स्वतंत्र उमेदवार म्हणून संसदीय निवडणूक लढवली, पण पराभव पत्करला. मात्र त्यांनी हार मानली नाही. पुढील वर्षी त्यांनी विजय मिळवला आणि १९९६ मध्ये लिबरल डेमोक्रेटिक पार्टी म्हणजेच एलडीपीमध्ये प्रवेश केला
तेव्हापासून त्या दहा वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत, फक्त एकदाच त्यांचा पराभव झाला. पक्षातील स्पष्टवक्ती, पारंपरिक विचारसरणीच्या नेत्या म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी सरकारमधील अनेक पदे सांभाळली आहेत.
आर्थिक सुरक्षामंत्री, व्यापार व उद्योग राज्यमंत्री आणि अंतर्गत व्यवहार व दळणवळण मंत्री म्हणून सर्वाधिक काळ काम केलेले आहे. २०२१ मध्ये ताकाइची यांनी एलडीपीच्या नेतृत्वासाठी पहिल्यांदा उमेदवारी दिली, पण त्यांचा पराभव झाला. २०२४ मध्ये केलेल्या प्रयत्नांनाही अपयश आले. यावर्षी, त्यांनी अखेर विजय मिळवला व पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
शिंजो आबे, त्यांची परंपरा आणि ताकाइची
ताकाइची या जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निकटवर्तीय होत्या. त्यांनी मोठा शासकीय खर्च आणि स्वस्त कर्ज घेण्याच्या आबेंच्या 'अॅबेनोमिक्स' आर्थिक धोरणांचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली आहे. मात्र, हे धोरण त्यांचा आदर्श असलेल्या बॅरोनेस थेंचर यांच्या विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. आबेप्रमाणेच ताकाइची यांची परराष्ट्र नीतीबाबतची भूमिका अत्यंत कठोर मानली जाते.