चमत्कार! भूकंपाच्या 6 दिवसांनंतर 90 वर्षीय महिलेला ढिगाऱ्यातून सुखरुप काढलं बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 15:24 IST2024-01-07T15:23:36+5:302024-01-07T15:24:57+5:30
1 जानेवारीला झालेल्या भूकंपात सर्वाधिक मृत्यू वाजिमा शहरात झाले. 126 जणांचा मृत्यू झाला आहे.

फोटो - AFP
जपानमध्येभूकंपानंतर सहा दिवसांनी एका 90 वर्षीय महिलेला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलं आहे. पश्चिम जपानमधील एका कोसळलेल्या घरातून 90 वर्षीय महिलेला जिवंत बाहेर काढण्यात आलं. भूकंपानंतर सुमारे 124 तासांनी महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. या भूकंपात 126 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये पाच वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. उकळत्या पाण्यात पडल्याने मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान भूकंप झाला आणि मुलाचा मृत्यू झाला.
1 जानेवारीला झालेल्या भूकंपात सर्वाधिक मृत्यू वाजिमा शहरात झाले. भूकंपानंतर येथे मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळाही दिसत होत्या. जपानी सैनिक युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. सुमारे तीस हजार लोकांना पाणी, अन्न, औषधे आणि इतर सुविधा पुरविण्यात आल्या.
लोक सरकारकडे करताहेत तक्रार
भूकंपानंतर निवासी भागांची दुरुस्ती करण्यासाठी सरकार प्रयत्न करत नसल्याची जपानमधील लोकांची तक्रार आहे. ज्यांची शोधमोहीम पूर्ण झाली आहे तो ढिगारा तसाच ठेवण्यात आला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ढिगाऱ्यांमुळे अनेक भागातील रस्ते बंद झाले आहेत.
कतरी वृत्तवाहिनीने जपानी योमीउरी वृत्तपत्राचा हवाला देत म्हटलं आहे की, त्यांच्या अभ्यासात या भागात 100 हून अधिक भूस्खलन झाल्याचं आढळून आलं आहे आणि काही प्रमुख रस्ते अडवले जात आहेत. काही समुदाय, जसे की शिरोमारूच्या किनारपट्टीवरील समुदाय, ज्यांना त्सुनामीचाही फटका बसला होता, अजूनही मदतीची वाट पाहत आहेत.