जगातील 15 टक्के लोक दररोज असतात व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 22:55 IST2017-07-27T22:41:44+5:302017-07-27T22:55:55+5:30
अल्पावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय झालेल्या व्हॉट्सअॅप इन्स्टंट मॅसेजिंग अॅपनं स्वतःच्या नावे एक नवा रेकॉर्ड केला आहे.

जगातील 15 टक्के लोक दररोज असतात व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन
वॉशिंग्टन, दि. 27 - अल्पावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय झालेल्या व्हॉट्सअॅप इन्स्टंट मॅसेजिंग अॅपनं स्वतःच्या नावे एक नवा रेकॉर्ड केला आहे. जगभरात व्हॉट्सअॅप या इन्स्टंट मॅसेजिंग अॅपवर 1 अब्जांहून अधिक यूझर्स सक्रिय असतात. तसेच महिन्याभरात 1.3 अब्ज यूझर्स हे व्हॉट्सअॅप वापरतात. कंपनीच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर प्रत्येक दिवशी 55 अब्ज मॅसेज शेअर केले जातात. यात 1 अब्ज व्हिडीओ मॅसेजचा समावेश आहे. तर 4.5 अब्ज मॅसेजमध्ये फोटोंचाही समावेश असतो.
व्हॉट्सअॅपचा 60 भाषांमध्ये वापर केला जातो. व्हॉट्सअॅपच्या ब्लॉगपोस्टनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये देण्यात आलेलं स्टेटस फीचरही लोकांच्या पसंतीस उतरलं आहे. इन्स्टाग्रामपासून प्रेरणा घेऊन बनवलेल्या या फीचरचा दररोज 25 कोटी यूझर्स वापर करतात. विशेष म्हणजे हा आकडा स्नॅपचॅट या अॅपच्या यूझर्सपेक्षाही जास्त आहे. स्नॅपचॅटवर दररोज 16.6 कोटी यूझर्स सक्रिय असतात. व्हॉट्सअॅपनं नवं स्टेटस फीचर कॉपी केल्याचा आरोप स्नॅपचॅटनं केला आहे. फेसबुकनं फेब्रुवारी 2014मध्ये व्हॉट्सअॅपचं अधिग्रहण केलं. त्यावेळी व्हॉट्सअॅपकडे 35 कोटी डेली यूझर्स होते. मात्र तीन वर्षांत या यूझर्सची संख्या तीन पटीनं वाढली आहे.
व्हॉट्सअॅपचे सीईओ जेन कोमनं ब्लॉगपोस्टमध्ये लिहिलं आहे की, या नव्या रेकॉर्डचा आनंद साजरा करताना आम्ही आणखी चांगले फीचर्स देण्यावर लक्ष्य केंद्रित केलंय. जेणेकरून यूझर्सला त्याचा फायदा होईल. तसेच हे नवनवे फीचर साध्या आणि सोप्या पद्धतीनं वापरता येतील, अशा प्रकारे तयार करण्यात येत आहेत. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये यू ट्युब व्हिडीओ प्ले बॅक फीचरही टाकण्यासाठी टेस्टिंग केलं जात आहे. व्हॉट्सअॅप कंपनी लागोपाठ नवनवे प्रयोग करत असून, भारतीय यूझर्सला पैशांची देवाण-घेवाण करणारी सुविधाही उपलब्ध करून देण्याच्या व्हॉट्सअॅफ कंपनी तयारीत आहे. व्हॉट्सअॅपचे यूझर्स अधिकाधिक वाढावेत यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.