"अखेरच्या बुलेटपर्यंत लढलो, जेव्हा गोळ्या संपल्या तेव्हा..."; पोलिसाने सांगितली थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:34 IST2025-03-13T12:32:59+5:302025-03-13T12:34:26+5:30
जर पाकिस्तानी सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ते प्रवाशांना मारून ट्रेनही जाळतील अशी धमकी बंडखोरांनी ओलीस बनवलेल्या लोकांना दिली.

"अखेरच्या बुलेटपर्यंत लढलो, जेव्हा गोळ्या संपल्या तेव्हा..."; पोलिसाने सांगितली थरारक घटना
जाफर एक्सप्रेस हायजॅक करून १०० हून अधिक लोकांना ओलीस ठेवल्यानंतर ३० तासांनी पाकिस्तानी लष्कराला मोठं यश मिळालं आहे. जाफर एक्सप्रेसमधील सर्व ओलीस ठेवलेल्या लोकांना बंडखोरांकडून सोडवण्यात आलं आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या ३३ बंडखोरांचा खात्मा करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये २१ प्रवाशांचाही जीव गेल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे.
एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानी लष्कराने ३०० हून अधिक जणांची सुटका केली आहे. या ट्रेनमध्ये ४०० प्रवाशांपैकी १०० सुरक्षा दलाचे जवान होते. यापैकी एका पोलीस अधिकाऱ्याने ट्रेन हायजॅकची संपूर्ण कहाणी सांगितली. तो म्हणाला की, ट्रेन हायजॅकची घटना खूप भयंकर होती. माझे सहकारी अखेरच्या गोळीपर्यंत बंडखोरांशी लढत राहिलो. हल्ल्याच्या वेळी ट्रेन कुठल्याही बोगद्यात जात नव्हती. ट्रॅकवर एक स्फोट झाला आणि अचानक ट्रेन थांबली. त्यानंतर काही वेळाने आसपासच्या डोंगरातून दहशतवादी बाहेर पडले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला असं त्याने सांगितले.
तसेच ते चहुबाजुने हल्ला करत होते, शेकडोच्या संख्येने होते आणि आम्ही केवळ ७५ पोलीस अधिकारी होतो. त्याशिवाय काही अर्धबल सैनिक होते. जेव्हा बंडखोर ट्रेनच्या दिशेने यायला लागले तेव्हा आम्ही आमच्याकडे जेवढ्या गोळ्या होत्या त्याचा वापर करायचे ठरवले. टीमने एकएक करून गोळीबारी सुरू ठेवली आणि बंडखोरांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे जितका शस्त्रसाठा होता त्याचा वापर केला. दीड तास आमच्यात आणि बंडखोरांमध्ये चकमक सुरू होती अशी थरारक कहाणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितली.
दरम्यान, आमच्याकडील गोळ्या संपल्यानंतर बंडखोरांना ट्रेनवर कब्जा करण्याची संधी मिळाली. बंडखोरांनी सर्वात आधी ट्रेनमधील प्रवास करणाऱ्या पोलिसांना ताब्यात घेतले. त्यांनी सर्व प्रवाशांना खाली उतरवले होते. प्रवाशांची ओळख पटवून त्यांना वेगवेगळे केले जात होते. जर पाकिस्तानी सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ते प्रवाशांना मारून ट्रेनही जाळतील अशी धमकी बंडखोरांनी ओलीस बनवलेल्या लोकांना दिली.
बंडखोरांच्या तावडीतून कसे सुटले?
घटनेवेळी रात्र झाली तेव्हा बहुतांश हल्लेखोर तिथून निघून गेले आणि केवळ २०-२५ बंडखोर ओलीस प्रवाशांसोबत तिथे सुरक्षेसाठी थांबले. काही ओलीस ठेवलेल्या लोकांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना गोळी मारून ठार केले. पळून चाललेले लोक गोळी लागल्याने जमिनीवर कोसळून पडत होते. हायजॅकच्या दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रंटियर कॉर्प्सच्या अतिरिक्त दलाकडे बंडखोरांचे लक्ष गेले तेव्हा त्या संधीचा फायदा घेत काही पोलीस अधिकारी बंडखोरांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाले.