इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 22:13 IST2025-12-10T22:12:37+5:302025-12-10T22:13:10+5:30
महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी संपर्क कायम ठेवण्यावरही सहमती दर्शवली आहे.

इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. नेतन्याहू यांनी सायंकाळच्या सुमारास पंतप्रधानमोदींना फोन केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. महत्वाचे म्हणजे, भारत-इस्त्रायल स्ट्रेटेजिक पार्टनरशिपमध्ये (Strategic Partnership) सातत्याने होत असलेल्या प्रगतीसंदर्भात आनंद व्यक्त केला.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी, विकासासाठी ही भागीदारी अधिक मजबूत करण्यासाची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.
दहशतवादाविरोधात Zero-Tolerance धोरण कायम -
यावेळी, पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच, दहशतवादाच्या कोणत्याही स्वरूपाबद्दल Zero-Tolerance धोरण कायम असेल, हे स्पष्ट केले.
चर्चेत गाझा शांतता योजना लवकरात लवकर लागू करण्याच्या मुद्द्याचाही समावेश -
याशिवाय, दोन्ही पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील सध्याच्या स्थितीवरही संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी या प्रदेशात स्थायी शांततेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. यामध्ये गाझा शांतता योजना लवकरात लवकर लागू करण्याच्या मुद्द्याचाही समावेश आहे.
महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी संपर्क कायम ठेवण्यावरही सहमती दर्शवली आहे.