Israel-Palestine Updates: इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षामुळे भारतीय परिचारिकांचा जीव टांगणीला; नोकरीही धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 09:15 IST2021-05-16T09:14:49+5:302021-05-16T09:15:12+5:30
केरळी महिलांची बहुसंख्या, केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील के. संतोष या शेतकऱ्याची पत्नी सौम्या इस्रायलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती.

Israel-Palestine Updates: इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षामुळे भारतीय परिचारिकांचा जीव टांगणीला; नोकरीही धोक्यात
तेल अवीव : इस्रायल व पॅलेस्टिनी बंडखोरांमध्ये गुरुवारी झालेल्या संघर्षात रॉकेट हल्ल्यामध्ये गुरुवारी इस्रायलच्या अश्केलोन शहरात काम करणारी सौम्या संतोष ही भारतीय परिचारिका ठार झाली होती. या घटनेमुळे इस्रायलमध्ये काम करणाऱ्या भारतीय पारिचारिकांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत. या परिचारिकांमध्ये केरळी महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील के. संतोष या शेतकऱ्याची पत्नी सौम्या इस्रायलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती. तिच्या मृत्यूमुळे के. संतोषला मोठा धक्का बसला आहे. गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी बंडखोर व इस्रायली सैन्यातील चकमकींमुळे भारतीय पारिचारिकांचा जीव, तसेच उपजीविकेचे साधन अशा दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत. सध्या १३२०० भारतीय परिचारिका काम करतात.
दरमहा एक लाख रुपये पगार
केरळ सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, इस्रायलमध्ये कार्यरत भारतीय परिचारिकांमध्ये केरळमधील महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. केरळमध्ये इस्रायलच्या व्हिसाला खूप मागणी आहे. इस्रायलमध्ये भारतीयांना नोकरी मिळण्यासाठीची प्रक्रिया खूप किचकट नाही. तिथे काम करणाऱ्या भारतीय परिचारिकांना ओव्हरटाइम धरून दर महिन्याला एक लाख ते एक लाख तीस हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.