येमेनची हुती नियंत्रित राजधानी सना येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, राजधानी सनाच्या दक्षिणेकडील एका वीज केंद्रावर इस्त्रायली नौदलाने मोठा हल्ला केला आहे, ज्यामुळे अनेक जनरेटर बंद पडले आहेत. अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या भागात मोठे स्फोट झाल्याने वीज केंद्राचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
हुतीनीं 'आक्रमकते'ला ठरवले जबाबदारदुसरीकडे, इराण-समर्थित हुती गटाने या हल्ल्यासाठी 'आक्रमकते'ला जबाबदार ठरवले आहे. मात्र, या हल्ल्यावर इस्त्रायल डिफेन्स फोर्सकडून (आयडीएफ) अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. इस्त्रायली नौदलाने येमेनवर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जूनमध्ये हुती-नियंत्रित होदेदा बंदरावर हल्ला करण्यात आला होता.
हाजिफ पॉवर स्टेशनला बनवले लक्ष्यआर्मी रेडिओच्या मते, इस्त्रायली नौदलाने येमेनच्या हाजिफ पॉवर स्टेशनला लक्ष्य केले आहे. आता या हल्ल्याची तुलना होदेदा बंदरावरील हल्ल्याशी केली जात आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, सनात किमान दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्फोटाच्या व्हिडीओमध्ये एका इमारतीतून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला दिसत आहेत.
हुतींकडून इस्त्रायलवर अनेक महिन्यांपासून हल्लेहुती गट गेल्या अनेक महिन्यांपासून इस्त्रायलवर हल्ले करत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलही हुतींवर हल्ले करत आहे. दुसरीकडे, येमेनी गट इस्त्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागत आहे. त्यातील बहुतांश क्षेपणास्त्रे थांबवली गेली किंवा आकाशातच नष्ट करण्यात आली.
अमेरिका आणि ब्रिटननेही यापूर्वी येमेनमध्ये हुतींविरुद्ध हल्ले केले होते. मे २०२५ मध्ये अमेरिकेने हौथींसोबत एक करार केला होता. या करारानुसार, जहाजांवरील हल्ले थांबवल्यास बॉम्ब हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवण्यात आली होती. दुसरीकडे, हुतींनी सांगितले होते की, या करारामध्ये इस्त्रायलचा समावेश नव्हता.