युएई: इस्रायलने ड्रोनद्वारे पाकिस्तानी मालवाहू जहाजावर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी केला आहे. पाकिस्तानला जाणाऱ्या एका एलपीजी टँकरवर इस्त्रायलने ड्रोन हल्ला केला आणि नंतर जहाजावरील २४ पाकिस्तानी क्रू मेंबर्ससह २७ लोकांना हुती बंडखोरांनी ओलीस ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. १७ सप्टेंबर रोजी यमनच्या किनारपट्टीजवळ ही घटना घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ड्रोन हल्ल्यामुळे टँकरमधील गॅस टँकमध्ये आग लागली आणि स्फोट झाला. त्यानंतर येमेनमधील हूती बंडखोरांनी हे जहाज ताब्यात घेतले आणि क्रू मेंबर्सना ओलीस ठेवले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात इस्त्रायलचा थेट उल्लेख केला नव्हता. मात्र, नकवी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सांगितले की, रास अल-इसा बंदरातून उडालेल्या इस्त्रायली ड्रोनने हा हल्ला घडवून आणला.
नकवी यांनी पाकिस्तानचे सौदी अरेबिया आणि ओमानमधील अधिकाऱ्यांचेही आभार मानले, ज्यांनी क्रू मेंबर्सची आणि टँकरची सुरक्षित सुटका केली. दरम्यान, इस्त्रायलने या हल्ल्याच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. तज्ञांच्या मते, पाकिस्तान सौदी अरेबिया आणि इस्त्रायलमधील संबंधांमध्ये तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत असावा, म्हणूनच हा दावा केला गेला आहे.