इस्रायल गाझाला घेरणार! सीमेवर १ लाख सैनिक तैनात; अन्न, इंधनाची रसद तोडणार, १४०० जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 06:27 AM2023-10-10T06:27:58+5:302023-10-10T06:28:24+5:30

शनिवारपासून सुरू झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूकडील १४०० जणांना जीव गमवावा लागला. 

Israel will surround Gaza 1 lakh soldiers deployed on border; Food, fuel logistics will be cut off, 1400 people will be killed | इस्रायल गाझाला घेरणार! सीमेवर १ लाख सैनिक तैनात; अन्न, इंधनाची रसद तोडणार, १४०० जण ठार

इस्रायल गाझाला घेरणार! सीमेवर १ लाख सैनिक तैनात; अन्न, इंधनाची रसद तोडणार, १४०० जण ठार

googlenewsNext

तेल अवीव : गाझामधून इस्रायलमध्ये घुसून हल्ला केल्यानंतर हमासविरोधात इस्रायलने मोहीम सुरू केली असून, आता गाझाला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. हमासशी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी सोमवारी गाझा पट्टीची संपूर्ण घेराबंदी करण्याचे, वीजपुरवठा खंडित करण्याचे आणि अन्न व इंधनाची रसद तोडण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलने गाझा सीमेवर १ लाख सैनिक पाठवले आहेत. शनिवारपासून सुरू झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूकडील १४०० जणांना जीव गमवावा लागला. 

गॅलंट इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या दक्षिणी कमांडमध्ये तयारीचा आढावा घेत होते. गाझा आपल्या मूलभूत गरजांच्या पुरवठ्यासाठी मुख्यत्वे इस्रायलवर अवलंबून आहे आणि अशा निर्णयामुळे या दाट लोकवस्तीच्या भागात राहणाऱ्या २३ लाख लोकांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. २००७ मध्ये हमासने प्रतिस्पर्धी पॅलेस्टिनी सैन्याकडून सत्ता काबीज केल्यापासून इस्रायल व इजिप्तने गाझावर विविध स्तरावरील निर्बंध लादले आहेत.

इस्रायलने हमासचे वॉर रूम्स एका रात्रीत केले नष्ट 
इस्रायलच्या हवाई दलाने हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे ५०० युद्ध नियंत्रण कक्ष (वॉर रूम्स) रविवारी रात्री नष्ट केले. युद्धाच्या तिसऱ्या दिवशी आतापर्यंत ७०० इस्रायलींचा मृत्यू झाला, तर इस्रायलच्या प्रत्युत्तरात ५०० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि २००० हून अधिक जखमी झाले आहेत.

अमेरिकेची लढाऊ विमाने, फोर्ड युद्धनौका मदतीला 
अमेरिकेने इस्रायलला लष्करी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन म्हणाले, आमची जहाजे आणि लढाऊ विमाने मदतीसाठी इस्रायलच्या दिशेने जात आहेत. आम्ही यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड विमानवाहू युद्ध नौका सज्ज ठेवली आहे. 

इस्रायलचे गाझापट्टीवर हल्ले तीव्र
इस्रायलच्या सैन्याने गाझापट्टीत हवाई हल्ले तीव्र करीत हमासच्या लढवय्यांना मागे हटवण्यास सुरुवात केली आहे. हमासने गाझामधून अभूतपूर्व घुसखोरी सुरू केल्यानंतर दोन दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतर लष्कराने सांगितले की, तूर्तास रस्त्यावरची लढाई जवळजवळ संपुष्टात आली आहे.

परदेशी नागरिकांचा मृत्यू
हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत ३३ परदेशी नागरिकांचा जीव गेल्याचेही वृत्त आहे. यामध्ये नेपाळचे १०, अमेरिकेचे ९, थायलंडचे १२ आणि युक्रेनचे २ नागरिक आहेत. या हल्यांचा भारताने निषेध व्यक्त केला आहे.

१३० ओलिसांचा ढाल म्हणून वापर
हमासने १३० इस्रायली नागरिकांचे अपहरण केल्याचा दावा केला आहे. त्यांना गाझा पट्टीतील बोगद्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. ते या ओलिसांचा मानवी ढाल म्हणून वापर करण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Israel will surround Gaza 1 lakh soldiers deployed on border; Food, fuel logistics will be cut off, 1400 people will be killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.