Iran Missile Test: इस्रायलसोबतचा संघर्ष थांबला असला, तरी इराणने लष्करी क्षमता वाढवण्यावर अधिक भर देणं सुरू केलं आहे. इराणने आता दहा हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. इराणच्या एका खासदारानेच याला दुजोरा दिला आहे.
रविवारी (२१ सप्टेंबर) इराणमध्ये सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ इराणच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलच्या यशस्वी चाचणीचा असल्याचे खासदाराने सांगितले. ही मिसाईल स्पेस लॉन्च व्हेईकल (SLV) तंत्रज्ञानावर आधारित आहे. हिची १० हजार किमीपेक्षा जास्त अंतरावर मारा करण्याची क्षमता असल्याचे खासदार मोहसिन झांगनेह यांनी सांगितले.
खासदार झांगनेह यांनी असाही दावा केला की, ही मिसाईल अमेरिका आणि युरोपपर्यंतही मारा करू शकते. अवकाश प्रक्षेपण कार्यक्रमाचाच भाग असलेल्या सॅटेलाईट लॉन्च व्हेईकलच्या आधारावरच ही मिसाईल तयार करण्यात आली आहे. इराणची ही सर्वात अत्याधुनिक मिसाईल आहे. व्हिडीओमध्ये जो धूर दिसत आहे, तो मिसाईलच्या यशस्वी प्रक्षेपणानंतरचा आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी काय म्हटलंय?
इराणच्या या नव्या मिसाईलच्या यशस्वी चाचणीबद्दल अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले गेलेले आहे की, जर आता निर्णय घेतला तर इराण २०३५ पर्यंत आयसीबीएम विकसित करू शकतो. सध्या इराणकडे खोर्रमशहर ४ आणि फतेह २ यासारख्या २ हजार ते ३ हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या मिसाईल्स आहेत.