हृदयद्रावक! "रुग्णांचा जीव धोक्यात"; गाझाच्या एकमेव कॅन्सर रुग्णालयाचं कामकाज ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 11:10 IST2023-11-02T11:10:17+5:302023-11-02T11:10:52+5:30
Israel Palestine War : युद्धामुळे गाझामधील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

हृदयद्रावक! "रुग्णांचा जीव धोक्यात"; गाझाच्या एकमेव कॅन्सर रुग्णालयाचं कामकाज ठप्प
हमास आणि इस्रायल (Israel Palestine Conflict) यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्धामुळे गाझामधील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य अधिकार्यांनी बुधवारी सांगितलं की, गाझा पट्टीचं एकमेव कॅन्सर रुग्णालयातील इंधन संपल्याने तेथील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अल-जजीरावर प्रसारित झालेल्या पत्रकार परिषदेत तुर्की-पॅलेस्टिनी रुग्णालयाचे संचालक म्हणाले की, कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या या एकमेव रुग्णालयाचे कामकाज इंधन संपल्याने ठप्प झाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
सुभी स्काईकच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सरच्या रुग्णांना उपचाराअभावी होणाऱ्या मृत्यूपासून वाचवण्याचं आवाहन आम्ही जगाला करतो आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्री माई अल-कैला यांनी एका निवेदनात संचालकांच्या टिप्पण्यांची पुष्टी केली आणि म्हटलं की यामुळे गाझामधील रुग्णालयांची संख्या एकूण 35 पैकी 16 झाली आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की रुग्णालयातील 70 कॅन्सर रुग्णांच्या जीवाला गंभीर धोका आहे.
7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ले केले होते. घुसखोरी करताना हमासच्या सैनिकांनी 1400 जणांची हत्या केली होती. यासोबतच हमासच्या सैनिकांनी 240 लोकांना ओलीस ठेवलं होतं, त्यानंतर गाझा पट्टीमध्ये इस्रायली लष्कराची प्रत्युत्तराची कारवाई सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 8,500 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, ज्यामध्ये दोन तृतीयांश महिला आणि मुलं आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.