इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 21:16 IST2025-09-16T21:15:48+5:302025-09-16T21:16:18+5:30
...दुसरीकडे, इस्रायली सैन्यानेही एक निवेदन जारी करत, हुथींकडून होदेदा बंदरातील वापरली जाणारी लष्करी ठिकाने उद्ध्वस्त करण्यात आली असल्याचे, म्हटले आहे.

इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
इस्रायलने येमेनच्या होदेदा शहरातील बंदरावर मोठा हल्ला केल्याचा दावा येमेनमधील हुथी बंडखोरांनी केला आहे. याशिवाय, या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे. हुथी संघटनेचे प्रवक्ते याह्या सारी यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये, सध्या आमची हवाई संरक्षण यंत्रणा इस्रायली विमानांना रोखण्याचे काम करत आहे. आमच्या देशावर अत्यंत आक्रमक हल्ला करण्यात आला आहे, असे याह्या यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, इस्रायली सैन्यानेही एक निवेदन जारी करत, हुथींकडून होदेदा बंदरातील वापरली जाणारी लष्करी ठिकाने उद्ध्वस्त करण्यात आली असल्याचे, म्हटले आहे.
इस्रायली सैन्याने जारी केलेल्या निवेदनानुसार, होदेदा बंदराचा वापर हुथी दहशतवादी करत होते. येथेच इराणकडून हुथी बंडखोरांना शस्त्रास्त्रे हस्तांतरित केली जात होती. या शस्त्रांचा वापर इस्रायल आणि सहकारी देशांवर हल्ले करण्यासाठी केला जात होता. दरम्यान, सारी यांनीही एका निवेदन जारी करत म्हटले आहे की, हुथींची हवाई संरक्षण यंत्रणा इस्रायली विमानांसाठी मोठा अडथळा ठरली आहे. हल्ला करण्यापूर्वीच या यंत्रणेने काही लढाऊ विमानांना येमेनी हवाई हद्द सोडण्यास भाग पाडले. यामुळे इस्रायलची येमेनमध्ये अधिक घुसखोरी करण्याची इच्छा अयशस्वी ठरली.
महत्वाचे म्हणजे, शेकडो लोकांनी 31 येमेनी पत्रकारांच्या अंत्यसंस्कारात भाग घेतलेला असतानाच, हे हल्ले करण्यात आले. संबंधित पत्रकार गेल्या आठवड्यात इस्रायली हवाई हल्ल्यात मारले गेले होते. हे हल्ले यमनची राजधानी सना येथे इराण समर्थित हुथी बंडखोरांना लक्ष्य करून करण्यात आले होते. खरे तर, हूतींनी एक ड्रोन हल्ला केला होता, जो इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भेदून इस्रायली हवाई अड्ड्यावर आदळला होता. यामुळे काचेच्या खिडक्या तुटल्या आणि एक व्यक्ती जखमी झाली होती.