गाझा पट्टीवर इस्रायलने एक लाख सैनिक उतरवले; इंधन, खाद्यपदार्थांवरही बंदी, नाकाबंदी लादणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 04:59 PM2023-10-09T16:59:54+5:302023-10-09T17:00:30+5:30

युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या ११०० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Israel lands 100,000 soldiers in Gaza; Ban and blockade will be imposed on fuel and food | गाझा पट्टीवर इस्रायलने एक लाख सैनिक उतरवले; इंधन, खाद्यपदार्थांवरही बंदी, नाकाबंदी लादणार

गाझा पट्टीवर इस्रायलने एक लाख सैनिक उतरवले; इंधन, खाद्यपदार्थांवरही बंदी, नाकाबंदी लादणार

googlenewsNext

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे, अशा स्थितीत इस्रायल आता गाझावरील शेवटच्या युद्धाच्या तयारीत आहे. इस्रायल गाझा पट्टीवर संपूर्ण नाकाबंदी लादणार आहे. या नाकाबंदीमध्ये खाद्यपदार्थ, इंधन आणि परिसरात प्रवेश बंदी देखील समाविष्ट आहे. इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये तीन दिवस चाललेल्या संघर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

गाझा पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी इस्रायलने १ लाख सैनिकही पाठवले आहेत. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलांट म्हणाले, 'मी गाझा पट्टीला पूर्ण वेढा घालण्याचे आदेश दिले आहेत. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या ११०० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. फक्त इस्रायलबद्दल बोलायचे झाले तर हमासच्या हल्ल्यात त्यांच्या ४४ सैनिकांसह ७०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. 

इस्रायली सैन्याने सांगितले की, गाझामधून अनपेक्षित घुसखोरी करून हमासचे अतिरेकी लपून बसले होते. अशा दक्षिणेकडील भागांवर इस्रायलने पुन्हा ताबा मिळवला आहे. हमासच्या या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलला अतिरिक्त पाठिंबा जाहीर केला आहे. यूएस संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी यूएसएस गेराल्ड आर फोर्ड विमानवाहू युद्धनौका आणि युद्धनौकांच्या गटाला पूर्व भूमध्य समुद्राकडे निर्देशित केले. 

गाझा पट्टीवर सातत्याने रॉकेट हल्ले होत असून त्यावर इस्रायल नेहमीच आक्रमक राहिला आहे. गाझा पट्टी हा इस्रायल, इजिप्त आणि भूमध्य समुद्राच्या मधोमध वसलेला एक छोटासा परिसर आहे, जो जगातील सर्वात दाट लोकवस्तीचा भाग म्हणूनही ओळखला जातो. दहशतवादी इस्लामिक पॅलेस्टिनी संघटना हमास गाझामधूनच इस्रायलवर हल्ले करत आहे. गाझा पट्टी हे अंदाजे दहा किलोमीटर रुंद आणि ४१ किलोमीटर लांबीचे क्षेत्र आहे. येथे २ दशलक्षाहून अधिक लोक राहतात. याचा अर्थ प्रति चौरस किलोमीटर सरासरी ५५०० लोक राहतात. इस्रायलबद्दल बोलायचे झाल्यास, येथे सरासरी लोकसंख्येची घनता सुमारे ४०० लोक प्रति चौरस किलोमीटर आहे, ज्यावरून गाझा किती दाट लोकवस्ती आहे हे समजू शकते.

असा आहे इतिहास-

पॅलेस्टाईन आणि इतर अनेक मुस्लिम देशांनी इस्रायलला ज्यू राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. १९४७ नंतर, जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाईनची ज्यू आणि अरब राष्ट्रांमध्ये विभागणी केली, तेव्हा पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील संघर्ष सुरूच आहे. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो राज्य म्हणून स्वीकारण्याचा आणि दुसरा गाझा पट्टीचा, जो इस्रायलच्या स्थापनेपासून इस्रायल आणि इतर अरब देशांमधील संघर्षाला कारणीभूत ठरला आहे. जून १९६७ च्या युद्धानंतर इस्रायलने पुन्हा गाझा पट्टी ताब्यात घेतली. त्यानंतर २५ वर्षे इस्रायलने आपला ताबा कायम ठेवला. परंतु डिसेंबर १९८७ मध्ये गाझामधील पॅलेस्टिनी लोकांमध्ये दंगली आणि हिंसक संघर्षाने उठावाचे रूप धारण केले. सप्टेंबर २००५ मध्ये, इस्रायलने आपल्या प्रदेशातून माघार पूर्ण केली आणि गाझा पट्टीचे नियंत्रण पॅलेस्टिनी प्राधिकरण (PA) ला दिले. तथापि, इस्रायलने क्षेत्र संरक्षण आणि हवाई गस्त सुरू ठेवली.

गाझावर राज्य कोणाचं?

गाझा पट्टीवर २००७ पासून दहशतवादी इस्लामिक गट हमासचे राज्य आहे. हमासने इस्रायलसोबतची शांतता प्रक्रिया नाकारून आपल्या सनदेत इस्रायलचा नाश करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हमासचे अतिरेकी गाझामधून इस्रायलच्या भूभागावर रॉकेट हल्ले करत आहेत, मात्र हा सर्वात भीषण हल्ला असल्याचे बोलले जात आहे. २००७ मध्ये हमासने गाझा पट्टी ताब्यात घेतल्यापासून, इस्रायलने याकडे "शत्रूचा प्रदेश" म्हणून पाहिले आहे. इस्रायलचे पाणी, जमीन आणि हवेवर नियंत्रण आहे. तेव्हापासून हमास इस्रायलवर हल्ले करत आहे. यामुळे भूतकाळात २००८-०९, २०१२, २०१४ आणि २०२१ मध्ये इस्रायली सैन्यासोबत चार मोठे लष्करी संघर्ष झाले आहेत.

Web Title: Israel lands 100,000 soldiers in Gaza; Ban and blockade will be imposed on fuel and food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.