"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:50 IST2024-10-22T09:51:47+5:302024-10-22T10:50:33+5:30
Israel-Hezbollah War: रुग्णालयावर हल्ला करणार नसल्याचेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
Israel-Hezbollah War: इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या आर्थिक केंद्राची गुप्त माहिती सार्वजनिक केली आहे. बेरूतमधील रुग्णालयाखाली बांधलेल्या बंकरमध्ये हिजबुल्लाहने लाखो डॉलर्सची रोकड आणि सोने लपविल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. तसेच, रुग्णालयावर हल्ला करणार नसल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.
इस्रायली लष्कराचे (आयडीएफ) प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी म्हणाले, "हे बंकर हिजबुल्लाहचा नेता सय्यद हसन नसराल्लाह याने बांधले होते. तसेच, हे बंकर दीर्घकाळ टिकण्यासाठी डिझाइन केले होते. सध्या बंकरमध्ये लाखो डॉलर्सची रोकड आणि सोने आहे. मी लेबनीज सरकार, लेबनीज अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना आवाहन करतो की, हिजबुल्लाहला हा पैसा दहशत पसरवण्यासाठी आणि इस्रायलवर हल्ला करण्यासाठी वापरू देऊ नका. इस्रायली वायुसेना परिसरावर लक्ष ठेवून आहे. मात्र, आम्ही रुग्णालयावर हल्ला करणार नाही."
रुग्णालयाच्या संचालकांनी दिलं प्रत्युत्तर!
इस्रायल खोटे आणि बदनामीकारक दावे करत आहे, असे शिया अमल मूव्हमेंट पार्टीचे लेबनीज खासदार आणि संलग्न रुग्णालय अल-साहेलचे संचालक फादी अलमेह यांनी रॉयटर्सला सांगितले. तसेच, फादी अलमेह यांनी लेबनीज सैन्याला रुग्णालय परिसरात जाण्यास सांगितले आणि आपल्याकडे फक्त ऑपरेटिंग रूम, रूग्ण आणि शवागार असल्याचे दाखवावे असे म्हटले. तसेच, रुग्णालय रिकामी केले जात आहे, असेही फादी अलमेह यांनी सांगितले.
"हिजबुल्लाहवर हल्ले सुरुच राहणार"
रविवार आणि सोमवारच्या रात्री विमानांनी अल-कार्द अल-हसनच्या जवळपास ३० ठिकाणांवर हल्ला केला, असे इस्रायलचे चीफ ऑफ जनरल स्टाफ हर्जेई हलेवी यांनी सांगितले. याबद्दल इस्रायलचे म्हणणे आहे की, ही हिजबुल्लाहची आर्थिक शाखा आहे. तसेच, इस्त्रायल हिजबुल्लाहच्या आर्थिक लक्ष्यांवर हल्ले करत राहणार असल्याचे डॅनियल हगारी यांनी सांगितले.