इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम होणार? UN मध्ये उद्या मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 15:50 IST2024-02-19T15:46:19+5:302024-02-19T15:50:36+5:30
Israel-Hamas war : अल्जेरियाच्या अरब प्रतिनिधीने मसुदा ठरावाला अंतिम रूप दिले आहे, ज्यावर परिषदेमध्ये मतदान केले जाऊ शकते.

इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम होणार? UN मध्ये उद्या मतदान
Israel-Hamas war : (Marathi News) गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. आता इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम होईल की नाही, यावर मंगळवारी संयुक्त राष्ट्रात मतदान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणाऱ्या अरब-समर्थित ठरावावर मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मतदान होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने मतदानात व्हिटो वापरण्याची घोषणा केली आहे. अल्जेरियाच्या अरब प्रतिनिधीने मसुदा ठरावाला अंतिम रूप दिले आहे, ज्यावर परिषदेमध्ये मतदान केले जाऊ शकते.
कौन्सिल डिप्लोमॅट्सने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मंगळवारी सकाळी मतदान होणार आहे. असोसिएटेड प्रेसनुसार, अल्जेरियाद्वारे तयार केलेला अंतिम मसुदा युद्धविराम व्यतिरिक्त परिषदेकडे केलेल्या मागण्यांचा पुनरुच्चार करतो. तसेच, इस्रायल आणि हमास यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे, विशेषत: नागरिकांच्या संरक्षणाचे निष्ठपूर्वक पालन करावे आणि पॅलेस्टिनी नागरिकांचे जबरदस्तीने विस्थापन नाकारावे, अशी मसुद्यात मागणी आहे.
'ओलिस करार' वर अमेरिकेकडून काम सुरु
अमेरिका गेल्या अनेक महिन्यांपासून 'ओलिस करार' वर काम करत आहे, ज्यामुळे किमान सहा आठवडे शांतता राखण्यात मदत होईल आणि चिरस्थायी शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्हाला अधिक वेळ मिळेल. आम्हाला वेळ मिळेल आणि आम्ही समस्या सोडवण्यासाठी योग्य ती पावले उचलू शकू, असे अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी एका निवेदनात म्हटले आहे. तसेच, त्यांनी सांगितले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इजिप्त व कतारच्या नेत्यांशी करार पुढे नेण्यासाठी अनेकदा चर्चा केली होती.