गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 23:31 IST2024-05-06T23:30:04+5:302024-05-06T23:31:57+5:30
इस्रायल आणि हमास यांच्यातील वादाचा मुख्य मुद्दा युद्धविरामाच्या कालावधीसंदर्भातील आहे. इस्रायलने संघर्ष थांबवावा अशी हमासची मागणी आहे, तर हमास जोवर पराभव मान्य करत नाही, तोवर युद्ध सुरूच राहील, असे इस्रायलचे म्हणणे आहे.

गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
इस्रायली लष्कराने सोमवारी राफावर एयर स्ट्राइक केल्याचे येथील नागरिकांनी म्हटले आहे. मात्र, यासंदर्भात इस्रायलकडून अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. तत्पूर्वी, इस्रायली सैन्याने पॅलेस्टाइनच्या हजारो नागरिकांना दक्षिण गाझातील रफा शहर खाली करण्यास सांगितले होते. यावरून तेथे लवकरच जमिनीवरील हल्ला होऊ शकतो, असे संकेत मिळाले होते. गाझामधील ओलीसांच्या सुटकेसाठी युद्धबंदीचे प्रयत्न सुरू असतानाच इस्रायलने रफावर हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यामुळे युद्धबंदीची चर्चा पटरीवरून घसरल्याचे दिसत आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील वादाचा मुख्य मुद्दा युद्धविरामाच्या कालावधीसंदर्भातील आहे. इस्रायलने संघर्ष थांबवावा अशी हमासची मागणी आहे, तर हमास जोवर पराभव मान्य करत नाही, तोवर युद्ध सुरूच राहील, असे इस्रायलचे म्हणणे आहे. राफा हा हमासचा शेवटचा महत्त्वाचा गड असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. तसेच, हमासला पराभूत करण्यासाठी जमिनीवर कारवाई आवश्यक असल्याचे इस्रायली नेत्यांनी वारंवार म्हटले आहे.
इस्रायलच्या लष्कराने सोमवारी पॅलेस्टिनींना पूर्व राफा रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, युद्धामुळे विस्थापित झालेल्या दहा लाखांहून अधिक पॅलेस्टिनींनी येथे आश्रय घेतला आहे. अरबी संदेश, टेलिफोन कॉल्स आणि फ्लायर्सद्वारे, इस्रायलच्या लष्कराने पॅलेस्टिनींना 20 किमी (7 मैल) दूर असलेल्या विस्तारित मानवतावादी झोनमध्ये जाण्याची सूचना दिली आहे.