‘हमासविरुद्धच्या युद्धात पडाल तर...’, PM नेतन्याहू यांची बड्या दहशतवादी संघटनेला थेट 'वॉर्निंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 15:22 IST2023-10-23T15:22:35+5:302023-10-23T15:22:56+5:30
आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, इराणचे समर्थन असलेल्या लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहला पुन्हा एकदा हमासला साथ देण्यावरून थेट इशारा दिला आहे.

‘हमासविरुद्धच्या युद्धात पडाल तर...’, PM नेतन्याहू यांची बड्या दहशतवादी संघटनेला थेट 'वॉर्निंग'
इस्रायल-हमास युद्ध गेल्या 17 दिवसांपासूनच सुरू आहे. हमासच्या ठिकाणांवर इस्रायलकडून जबरदस्त बॉम्बिंग आणि रॉकेट हल्ले केले जात आहेत. हे युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. या युद्धात आतापर्यंत 6 हजारहून अधिक मृत्यू झाले असून हजारो लोक जखमी झाले आहेत. यातच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, इराणचे समर्थन असलेल्या लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहला पुन्हा एकदा हमासला साथ देण्यावरून थेट इशारा दिला आहे. "जर हमासविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात पडाल, तर ही हिजबुल्लाची आतापर्यंतची सर्वात मोठी चूक असेल," असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
कमांडो ब्रिगेडचा दौरा -
लेबनानमधील सशस्त्र दहशतवादी संघटना हिजबुल्लाहविरुद्ध सुरू असलेल्या सैन्य कारवाईदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी रविवारी उत्तर इस्रायलमध्ये इस्रायल संरक्षण दल (आयडीएफ) कमांडो ब्रिगेडचा दौरा केला. यावेळी त्यांनी लष्करासोबत चर्चा केली. तसेच, जर हिजबुल्लाह हमास विरुद्धच्या युद्धात आला, तर हे दुसऱ्या लेबनान युद्धाचे कारण ठरेल आणि ते जीवनातील सर्वात मोठी चूक करतील.
हिजबुल्ला आणि लेबनानसाठी ठरेल विध्वंसक-
नेतन्याहू म्हणाले, ‘हिजबुल्लाह युद्धात पूर्णपणे सहभागी होणार की नाही. यासंदर्भात आपण भविष्यवाणी करू शकत नाही. मात्र जर हिजबुल्लाहने असे केले तर, त्याच्यावर पश्चातापाची वेळ येईल. आम्ही हिजबुल्लाहवर एका अशा शक्तीने हल्ला करू की, ज्याची ते कल्पनाही करू शकत नाही. हे हिजबुल्लाह आणि लेबनान राज्य दोघांसाठीही विध्वंसक ठरेल.’ एवढेच नाही, तर इस्रायल कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे, असे आश्वासनही नेतन्याहू यांनी दिले आहे.