हमास बनला 'जल्लाद', इस्रायलला माहिती पुरवल्याच्या संशयावरुन आठ जणांची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:41 IST2025-10-15T16:40:22+5:302025-10-15T16:41:34+5:30
Israel-Hamas-Gaza : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या काही लोकांना भररस्त्यात सर्वांसमोर गोळ्या घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हमास बनला 'जल्लाद', इस्रायलला माहिती पुरवल्याच्या संशयावरुन आठ जणांची निर्घृण हत्या
Israel-Hamas-Gaza : दोन वर्षांच्या सततच्या संघर्षानंतर अखेर इस्रायल आणि गाझामधील युद्ध तात्पुरतं थांबलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही बाजूंनी युद्धविराम (सीजफायर) करारास मान्यता दिली. मात्र, जमिनीवरील वास्तव काही वेगळंच दिसतंय. अलिकडेच हमासने अनेक इस्रायली बंधकांची सुटका केल्याचे फोटो, व्हिडिओ जगाने पाहिले. मात्र, आता त्याच हमासने काही लोकांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
एएफपीच्या (AFP) अहवालानुसार, १४ ऑक्टोबर रोजी हमासने गाझाच्या उद्ध्वस्त शहरांवर आपली पकड अधिक मजबूत केली आणि बदल्याची कारवाई सुरू केली. त्यांनी इस्रायलला माहिती पुरवल्याच्या संशयावरून काही स्थानिक नागरिकांना रस्त्यांवर गोळ्या घालून ठार मारलं.
हमासने आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या आणि गुडघ्यावर बसवलेल्या आठ संशयितांना गोळ्या घालताना दाखवण्यात आलं आहे. हमासचा दावा आहे की, हे सर्व इस्रायलचे सहकारी होते आणि इस्रायलला गुप्त माहिती पुरवायचे.
या भयावह दृश्यांमध्ये हमासचे बंदूकधारी लढवय्ये गर्दीसमोर गोळ्या झाडताना दिसतात. हा व्हिडिओ सोमवार रात्री हमासच्या अल-अक्सा टीव्हीच्या टेलिग्राम चॅनेलवर प्रसारित झाला. त्याच्या कॅप्शनमध्ये “इस्रायलच्या सहकाऱ्यांना मृत्युदंड” असं लिहिलं होतं. एएफपीच्या मते, हे फुटेज शस्त्रसंधीच्या पाचव्या दिवशीचं आहे.